संघप्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून हिजाबचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 08:32 PM2022-02-10T20:32:18+5:302022-02-10T20:32:51+5:30

Nagpur News कर्नाटकमधून सुरू झालेल्या हिजाबच्या वादामुळे देशातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हिजाबची बाजू उचलून धरली आहे.

Hijab support from office bearers of Sangh Pranit Muslim Rashtriya Manch | संघप्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून हिजाबचे समर्थन

संघप्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून हिजाबचे समर्थन

googlenewsNext

नागपूर : कर्नाटकमधून सुरू झालेल्या हिजाबच्या वादामुळे देशातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हिजाबची बाजू उचलून धरली आहे. देशात प्रत्येक संस्कृतीचा सन्मान झाला पाहिजे. हिजाब घालणाऱ्या महिला व मुलांच्या बाजूने आम्ही असल्याचा त्यांचा सूर आहे. दुसरीकडे संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व मंचचे संयोजक इंद्रेश कुमार यांनी मात्र शाळा-महाविद्यालयांत ड्रेस कोडचे पालन व्हायला हवे, अशी भूमिका मांडली आहे.

उत्तरप्रदेशपासून ते महाराष्ट्रापर्यंतचे मंचचे पदाधिकारी हिजाबच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल याचिकेचे त्यांनी समर्थन केले. अवध प्रांताचे संचालक अनिल सिंह यांनी या वादामुळे चर्चेत आलेली विद्यार्थिनी मुस्कान खानचे समर्थन करत ती आमच्या समाजाची मुलगी असून आम्ही तिच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. आम्हाला प्रत्येक धर्माची प्रथा, संस्कृती प्रिय आहे. सर्व नागरिकांनी एकमेकांच्या धर्माचा सन्मान केला पाहिजे. शीख धर्मात जे पगडीचे महत्त्व आहे, तेच हिजाबचे मुस्लिम धर्मात महत्त्व आहे. हिंदू महिलादेखील डोक्यावरून पदर घेतातच. सर्वांचा सन्मान व्हायला हवा. हिजाब ही मुस्लीम धर्माशी जुळलेली महत्त्वाची परंपरा आहे. देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी सर्वांचा सन्मान व्हायला हवा. सर्व धर्मीयांनी देशासाठी बलिदान केले आहे, असे मत महाराष्ट्र संयोजक फारूख शेख यांनी व्यक्त केले.

चित्रपटांमधील अश्लीलतेवर बंदी लागावी

हिजाबवर अकारण वाद निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात चित्रपटांच्या माध्यमातून अश्लीलतेचा जास्त प्रसार होत आहे. त्यावर बंदी लागायला हवी. या वादात पाकिस्तानच्या मंत्र्यांनी वक्तव्य केले होते; परंतु हा आमच्या घरातील मुद्दा आहे व आम्ही यावर तोडगा काढू, असे प्रतिपादन फारूख शेख यांनी केले.

Web Title: Hijab support from office bearers of Sangh Pranit Muslim Rashtriya Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.