अपहरणकर्त्यांनी राहुलला जिवंतच पेटवून दिले ; आरोपी अद्याप बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 08:15 PM2017-11-23T20:15:19+5:302017-11-23T20:22:12+5:30
विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. दुसरीकडे अपहरण केल्यानंतर आरोपींनी राहुलला बुटीबोरी जवळच्या रामा डॅमजवळ नेले आणि त्याला मारहाण करून जिवंतपणीच पेटवून दिले,अशी थरारक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, समाजमन सून्न झाले आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे. नागपूर-विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक म्हणून आग्रेकर ओळखले जातात. सुरेश आग्रेकर यांना राहुल तसेच जयेश नामक मुले आहेत. मंगळवारी सकाळी राहुल घराबाहेर पडला. काही अंतरावरच आरोपी दुर्गेश आपल्या साथीदारांसह बोलेरोत बसून होता. त्याने राहुलला बोलेरोत बसवून घेतले. सकाळचे ११.३० झाले तरी राहुल घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे तो म्हणाला. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर राहुलच्या क्रमांकावर फोन आला. फोन करणाराने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. दुसरीकडे अपहरण आणि खंडणीची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही आरोपींनी दिली. आग्रेकर कुटुंबीयांनी दुपारी ४ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्यात या संबंधाने माहिती दिली. पोलीस राहुल आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत असतानाच बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जळालेला मृतदेह नागरिकांना दिसला. त्यानुसार, बुटीबोरी पोलीस तेथे पोहचले. राहुल आग्रेकरचे अपहरण झाल्याची माहिती असल्याने बुटीबोरी पोलिसांनी या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना कळविली. त्यानंतर लकडगंज पोलीस तेथे पोहचले. मृतदेहाजवळ चावीचा गुच्छा आणि अन्य चिजवस्तू आढळल्याने तसेच घटनेच्या वेळी आरोपींचे मोबाईल लोकेशनही तिकडेच दिसत असल्याने तो मृतदेह राहुलचाच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. तशी माहिती लकडगंज पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, चेहरा ओळखू येत नसल्याने आग्रेकर कुटुंबीयांनी तो मृतदेह राहुलचा नसल्याचे सांगून तो ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावरून या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती.
अशी पटवली ओळख
तो मृतदेह राहुलचा की दुसऱ्या कुणाचा, असा प्रश्न पडल्याने पोलिसांनी मृतदेहाची डॉक्टरांकडून बारीकसारीक तपासणी करून घेतली. चार दिवसांपूर्वी राहुल पडला होता. यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. जखम मोठी नसली तरी ताजी होती. कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचारही केले होते. जळालेल्या मृतदेहाच्या डोक्यावरही ती जखम असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राहुलचे निवासस्थान गाठून त्याच्या कुटुंबीयांना जखमेबाबत विचारणा केली. राहुल आणि घरच्यांनाच त्या जखमेबाबत माहीत होते. त्यामुळे पोलिसांनी सांगितल्यानंतर तो मृतदेह राहुलचाच असल्याचे कुटुंबीयांनी मान्य केले.
दु:खाचा डोंगर कोसळल्याने शोकसंतप्त असलेल्या आग्रेकर कुटुंबीयांनी तशाही अवस्थेत आदर्श भूमिका घेतली. तो मृतदेह कुणाचाही असू द्या, सामाजिक बांधिलकीतून आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करू, असे म्हणत त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.
अंत्यदर्शन आणि आक्रोश
गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास आग्रेकर आणि त्यांच्या आप्तस्वकियांनी राहुलचा मृतदेह मेडिकलमधून ताब्यात घेतला. दारोडकर चौकातील आग्रेकर यांच्या निवासस्थानी तो नेण्यात आला. तोपर्यंत राहुलच्या पत्नीला त्याची हत्या झाल्याचे वृत्त सांगण्यात आले. ते ऐकून पत्नी अर्पिताने एकच आक्रोश केला. काही वेळेतच परत येतो, असे सांगून गेलेला राहुल आता कधीच परत येणार नाही या जाणिवेमुळे अर्पिता आणि अन्य महिलांची स्थिती वारंवार बेशुद्धावस्थेसारखी होत होती. काही वेळ मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर राहुलची अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहवला जात नव्हता. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. गंगाबाई घाट येथे शोकसंतप्त वातावरणात राहुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात मारेकऱ्यांनी राहुलला जिवंतपणीच पेटवून दिले. त्याचमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. यासंबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले.
डीएनए टेस्टसाठी धावपळ
तो मृतदेह कुणाचाही असो, सामाजिक दायित्वातून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका आग्रेकर परिवाराने घेतली अन् समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. दरम्यान, तो मृतदेह राहुलचाच आहे की दुसऱ्या कुणाचा त्याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी डीएनए टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने करून घेतली असून, लवकरात लवकर अहवाल मिळावा म्हणून पोलीस संबंधित तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. एकूणच या प्रकरणात अंधारात असलेले सर्व पैलू शोधून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंंकज हारोडे तसेच त्यांच्या साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके मध्य प्रदेश आणि लगतच्या राज्यातील गावात धावपळ करीत आहेत. आरोपींचे नातेवाईक आणि काही मित्रांकडूनही पोलीस आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.