न्यूजप्रिंटच्या भाववाढीने वृत्तपत्रांपुढे अस्तित्वाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:19 AM2018-04-07T01:19:55+5:302018-04-07T03:49:41+5:30
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या काळात ४८० डॉलर (३१,२०० रुपये)वरून ८०० डॉलर (५२,००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६० टक्के आहे.
- सोपान पांढरीपांडे
नागपूर - चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या काळात ४८० डॉलर (३१,२०० रुपये)वरून ८०० डॉलर (५२,००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६० टक्के आहे. परिणामी, भारतातील वृत्तपत्रांपुढे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
वृत्तपत्रांच्या उत्पादनात साधारण ६० ते ६५ टक्के खर्च फक्त न्यूजप्रिंट या एकाच कच्च्या मालावर होतो. त्यात साधारणपणे ५० ते ६० टक्के वाढ झाली आहे. ही भाववाढ कुठल्याही वृत्तपत्रासाठी न झेपणारी आहे. गेल्या काही महिन्यांत झालेली भाववाढ व त्यामुळे वाढलेला खर्च कुठूनही न भरून निघणारा असल्याने, त्यामुळे वृत्तपत्रांसमोर अस्तित्वाचाच प्रश्न उभा झाला आहे.
गेल्या तीन/चार वर्षांत जगात मलेशिया, कॅनडा, द. कोरिया, रशिया येथील कागद बनविणारे कारखाने विविध कारणाने बंद झाले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कागदाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, भारतातही न्यूजप्रिंट बनविणारे (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र इ.) कारखाने एक तर बंद पडले आहेत किंवा त्यांनी इतर कागद बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळेही न्यूजप्रिंटची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
न्यूजप्रिंट तयार करण्यासाठी जगभर कागदाची रद्दी आयात केली जाते व त्यापासून लगदा तयार करून न्यूजप्रिंट बनविला जातो. विकसित देशात प्रदूषण करणाऱ्या शहरी कच-याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे विकसित देश जगभर रद्दीबरोबर
शहरी कचरा मिसळून इतर देशांत पाठवित असतात. आपल्या देशातील कच-याची विल्हेवाट दुस-या देशाच्या माथी मारण्याची ही शक्कल आहे.
हा गैरप्रकार रोखण्यासाठी जागतिक व्यापार परिषदेने (डब्ल्यूटीओ) रद्दीबरोबर फक्त ०.१ टक्के कचरा असण्याचा नियम केला.
चीनने याच नियमाचा आधार घेऊन रद्दी मागविणे बंद केले आहे. त्यामुळे रद्दीची आयात थांबली आहे व हुआताई पेपर आणि
ग्वांगझो बीएम पेपर या दोन्ही पेपर मिल बंद झाल्या आहेत. म्हणून चीनने जगभरातून तयार न्यूजप्रिंट आयात करणे सुरू केले आहे व त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूजप्रिंटचे भाव ४८० डॉलर्सवरून (३१,२०० रुपये) ८०० डॉलर्स (५२००० रुपये) प्रतिटनावर गेले आहे.
भारतातील वृत्तपत्रांच्या किमती
-जगभर वृत्तपत्रांच्या किमती उत्पादन मूल्यावर ठरतात, पण भारतामध्ये मात्र तीव्र स्पर्धेमुळे वृत्तपत्रांच्या किमती खूप कमी असतात. विकसित देशामध्ये एका वृत्तपत्राच्या प्रतीची किंमत शेकडो रुपयात असू शकते, पण भारतात मात्र, इंग्रजी राष्ट्रीय दैनिके तीन ते सात रुपयांत मिळतात.
-याशिवाय भारतात वृत्तपत्राकडे उत्पादन म्हणून नव्हे, तर माहिती पुरविण्याचे साधन म्हणून बघितले जाते. त्यामुळे किमती कमी असतात व त्यात वाचकांचा फायदा असतो, पण आता कच्च्या मालाच्या (न्यूजप्रिंट) किमती ६० टक्क्याने वाढल्याने वृत्तपत्रांना ही चैन किती दिवस परवडणार आहे हा खरा प्रश्न आहे.
-चीनने आयातीत न्यूजप्रिंटचे भाव वाढविल्यामुळे भारतीय न्यूजप्रिंट कंपन्यांनीसुद्धा भाव ५० ते ६० टक्यांनी वाढविले आहेत, त्यामुळे छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे संकटात आली आहेत.
चीनचा तयार न्यूजप्रिंटवर भर का?
जगात २०१६ साली न्यूजप्रिंटची मागणी २३९.६० लाख टन
होती. त्यापैकी चीनची मागणी १७ ते १८ लाख टन होती. चीनमधील शँडाँग प्रांतातील हुआताई
पेपर समूह व ग्वांगझो प्रांतातील ग्वांगझो बीएम पेपर मिल
या दोन बलाढ्य कागद कंपन्या ही मागणी ९० टक्के पूर्ण
करत होत्या. उरलेला न्यूजप्रिंट छोट्या कागद उत्पादकांकडून मिळत होता.