नागपुरात दीपोत्सवात साकारले शिवकालीन गड-दुर्ग-किल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:19 PM2019-10-29T23:19:28+5:302019-10-29T23:22:11+5:30
इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्रिएटिव्हीटीला ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंत चालना देत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राला विविध राजवटींचा इतिहास आहे. यादव काळ, गोंडराजे, छत्रपती शिवाजी महाराज, नागपूरकर राजे भोसले यांच्या प्रगल्भ विचारसरणींतून महाराष्ट्र घडला आहे. हा इतिहास जेवढा रंजक तेवढाच बुद्धिभेद करणारा आहे आणि याची जाणीव महाराष्ट्रात ठिकठिकाणी ३००-४०० वर्षापासून दिमाखाने उभे असलेले गड-दुर्ग-किल्ले बघून होते. इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या स्थळांना भेटी देणे गरजेचे. त्याच अनुषंगाने इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्रिएटिव्हीटीला ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंत चालना देत असतात.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळांना सुट्या असतात आणि या सुट्यांचा उपयोग शालेय विद्यार्थी आपल्यातील कलात्मकतेसाठी करीत असतात. ही परंपरा खूप जुनी आहे. पुण्यामध्ये गड-दुर्ग-किल्ले साकारण्याचा उपक्रम संस्थात्मक स्तरावर राबविला जातो. नागपुरातही शिववैभव किल्ले स्पर्धेतर्फे स्पर्धा राबविली जाते. शहरात शंभराहून अधिक युवक स्पर्धात्मक स्तरावर तर पाचशेहून अधिक मुले हौस म्हणून किल्ले बनवित असतात. यासाठी काही युवक तर प्रत्यक्ष ज्या गड-दुर्ग-किल्ल्यांची प्रतिकृती साकारायची, त्या किल्ल्याला थेट भेट देतात. सोबतच, त्या किल्ल्याच्या इतिहासाचा अभ्यास करत असतात. अभ्यासामुळे इतिहासात त्या स्थळावर नेमक्या कोणत्या घटना घडल्या, त्या गड-दुर्ग-किल्ल्यांचे महत्त्व काय, त्याची संरक्षण व्यवस्था, व्यवहार, लोकवस्ती आदींची तपासणी केली जाऊन हे किल्ले साकारले जातात. बरेच मुले शिवकालीन तर कुणी यादवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत असल्याचे दिसून येते. यासाठीची तयारीही मोठी असते. किल्ल्यासाठी जागा तयार करणे, माती कसणे आणि मापपट्टीद्वारे नकाशे उतरवून त्यानुसार लांबी, रुंदी नुसार किल्ल्यांची प्रतिकृती तयार करणे, असा उपक्रम असतो. याला महिना-दीड महिना कलावधी जाते. त्यानंतर, वास्तविक हुबेहूब प्रतिकृती उभी राहत असते. शहरात महाल, नंदनवन, मानेवाडा, वाडी, धरमपेठ, सोमलवाडा, मनीषनगर, प्रतापनगर, खामला, बजाजनगर आदी ठिकाणी तेथील युवकांनी साकारलेली किल्ले आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. या किल्ल्यांना बघण्यासाठी रात्रंदिवस नागरिक जात असल्याचेही दिसून येते.
काल्पनिक किल्लेही साकारले जातात
शिवकालीन किल्ल्यांसोबतच अनेक जण काल्पनिक किल्लेही साकारत असल्याचे दिसून येते. यातून त्यांच्या कल्पनांना वाव मिळतो. त्यांची शिल्पकलेतील जाण विकसित होत जाऊन, भविष्यात एखादा वास्तू अभियंता निर्माण होण्याची शक्यता असते.
मुलांमध्ये वाढत आहे इतिहासाचे आकर्षण
शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले साकारण्याच्या ओढीमुळे मुले इतिहासातही डोकावायला लागली आहेत. त्या काळातील किल्ल्यांची रचना आणि हेतू शोधण्यासोबतच त्या काळात घडलेल्या घडामोडींचा अभ्यासही आपसूकच व्हायला लागला आहे. त्यामुळे, इतिहासात दडलेला जाज्वल्य पराक्रम मुलांचा डोळ्यांपुढे उभा राहायला लागला आहे.
वैदर्भीय किल्ले मात्र दुर्लक्षितच
विदर्भात गोंड राजे आणि राजे भोसल्यांची राजवट राहिली आहे. मात्र, या किल्ल्यांकडे पुरातत्त्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याने, तेथे इच्छा असूनही इतिहासप्रेमी व प्रतिकात्मक गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारणारे पोहोचत नाहीत. त्यामुळे, वैरागड, देवगिरी, डोंगरी आदीच्या प्रतिकृती साकारण्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने, वैदर्भीय किल्ल्यांच्या दर्शनाची सोय उपलब्ध झाली तरी इथला इतिहास दीपोत्सवात साकारल्या जाणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्येही सामावला जाऊ शकतो.
क्रिएटिव्हीटीचा आनंद प्राप्त होतो - रमेश सातपुते
मोबाईल, स्मार्टफोन्स या इडियट बॉक्समुळे क्रिएटिव्हीटी संपत चालली आहे. किल्ले बनविण्याचे काम कृतीप्रवण आणि बुद्धीला चालना देणारे ठरते. त्यासाठी थोडाच का होईना, अभ्यास करावा लागतो. शिवकालीन किल्ले बनविण्यामुळे शिवकाळाचा अभ्यास होतो आणि इतिहासाची जाणीव होते. शिवाय, नवनिर्मितीचा आनंद व काही तरी वेगळे केल्याचे समाधान प्राप्त होते. म्हणून दिवाळीच्या सुट्यांमध्ये किल्ले बनविण्याची परंपरा उत्साहवर्धक असल्याची भावना शिववैभव किल्ले स्पर्धेचे संयोजक रमेश सातपुते यांनी सांगितले.
मी शाळेत शिकवित असताना दिवाळीमध्ये शिवकालीन किल्ले बनवित आहे. शाळेतील मुलांनाही इतिहासाची उजळणी करण्यासाठी त्यांना किल्ले साकारण्यास प्रोत्साहन देत होते. किल्ले निर्मितीचे हे सलग २५ वे वर्ष असून, यंदा काल्पनिक किल्ला साकारला आहे. यापूर्वी रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड असे किल्ले साकारले आहेत.
रंजना जोशी (निवृत्त शिक्षिका), समर्थनगरी, सोनेगाव
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. माझे काका आणि मोठा भाऊ आधी किल्ले बनवित होते. गेल्या पाच वर्षापासून मी किल्ल्यांची प्रतिकृती साकारत आहे. यंदा विजयदुर्ग साकारला असून, महिनाभरापासून प्रतिकृती उभारत आहे.
विभव साठे, मानेवाडा