हिंदी व इंग्रजी नाटकांची नागपुरात समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:43 PM2019-02-14T12:43:16+5:302019-02-14T12:45:39+5:30
मराठी नाट्यसृष्टीचे वैभव पेलणाऱ्या संत्रानगरीच्या नाट्य रसिकांनी हिंदी आणि इंग्रजी नाटकांनाही पसंती दिली आहे.
निशांत वानखेडे/अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी नाट्यसृष्टीचे वैभव पेलणाऱ्या संत्रानगरीच्या नाट्य रसिकांनी हिंदी आणि इंग्रजी नाटकांनाही पसंती दिली आहे. हा भाग मूळचा मध्य प्रदेशला जोडला असल्याने हिंदी भाषकांची संख्या कमी नाही. तसेही विविध भाषेतील नागरिकांचे शहरात वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना हिंदी नाटकांचे सादरीकरण सातत्याने होते आहे आणि प्रेक्षकांचा तसा प्रतिसादही मिळत आहे. दुसरीकडे इंग्रजी भाषेच्या नाटकांचेही सादरीकरण होत असून त्या नाटकांचाही विशिष्ट वर्ग शहरात आहे, हे विशेष.
राष्टÑभाषा परिवारच्या माध्यमातून रूपेश पवार हे सातत्याने हिंदी नाटकांच्या प्रयोगांसाठी प्रयत्नरत राहिले आहेत. याशिवाय प्रियंका ठाकूर यांनीही गेल्या काही काळापासून विविध नाटकांच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे स्टेज क्राफ्ट संस्थेद्वारे नाट्य दिग्दर्शक विकास खुराणा यांनी इंग्रजी आणि हिंदी नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना दिली आहे.
नाट्यकलेला भाषेचे बंधन नाही
डॉ. विकास खुराणा हे इंग्रजी थिएटरमध्ये एक लोकप्रिय नाव आहे. डॉ. खुराणा गेल्या २० वर्षांपासून नागपुरात इंग्रजी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमी आणि कलारसिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांना संत्रानगरीच्या इंग्लिश थिएटरचे प्रवर्तक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १९९९ ला ‘काबुकी थिएटर’ फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपुरात त्यांच्या नाट्यमोहिमेला सुरुवात झाली. या महोत्सवात तीन भाषांमधील पाच नाटके सादर झाली. याच महोत्सवात डॉ. खुराणा यांनी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘प्रतिबिंब’ या मराठी नाटकाला हिंदीत सादर केले होते. अर्थात एलकुंचवार यांनीच हे नाटक करायला सांगितल्याची आठवण डॉ. खुराणा यांनी नमूद केली.
डॉ. खुराणा हे स्वत: १९८० पासून थिएटरशी जुळले आहेत. मुंबईला महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला व या काळात नाटकांचे प्रशिक्षण घेताना अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाहा यासारख्या मातब्बरांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते नागपूरला आले व येथे थिएटरशी जुळले. त्यांनी सांगितले की, २००० पूर्वी इंग्रजी नाटके ही शाळा-महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनापुरती मर्यादित होती. त्यांनी मात्र या नाटकांना रंगभूमीवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मित्रांच्या मदतीने वर्षाला एक-दोन तरी नाटके करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला. या काळात त्यांनी जवळपास ३५ नाटकांचे प्रयोग केले होते. पुढे २००३ मध्ये त्यांनी ‘स्टेज क्राफ्ट’ या संस्थेची स्थापना केली.
स्टेजक्रॉफ्ट : इंग्रजी थिएटरचे स्टेज... खुराणा पुढे
या संस्थेद्वारे त्यांनी चार एकपात्री प्रयोगांचे मिश्रण असलेल्या ‘कॅनव्हास’चा प्रयोग केला. शिवाय ‘स्मोक अॅन्ड मिरर’, ‘हिट अॅन्ड डस्ट’, ‘लव्ह अॅन्ड लॉन्जिंग्स’, ‘थंडर अॅन्ड लाईटनिंग’ अशा ७५ पेक्षा अधिक इंग्रजी नाटकांचे शहरात प्रयोग व स्वत: अभिनयही केला आहे. इंग्रजी नाटकांचा विशिष्ट वर्ग आहे. मात्र नाटकांना भाषेच्या बंधनात अडकविता येणार नाही. अनेक अडचणी असूनही मराठी रंगभूमी जिवंत आहे आणि या क्षेत्रातील माणसे काही ना काही नवं करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहे. कलावंत पैशासाठी नाही तर कलेच्या प्रेमासाठी कार्य करीत असतो. मराठी नाट्य संमेलन व परिषदेकडून अधिक अपेक्षा नाहीत कारण कोणत्याही भाषेची असो रंगभूमी जिवंत राहिली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हिंदी रंगभूमीचे नवे पर्व
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मात्र हिंदी नाटकांची संख्या कमी होत गेली. काही मराठी संस्थांद्वारे हिंदी नाटके व्हायची पण त्यांची संख्या नगण्य होती. २००० सालापासून मात्र नव्याने हिंदी नाटकांचे वर्षातून एकदोन तरी प्रयोग सातत्याने होत आहेत. यात बाहेरील दिग्दर्शकांच्या नाटकांची संख्या अधिक आहे. हबीब तनवीर, राकेश बेदी, सुधीर मिश्रा, जयंत देशमुख आदी नाटककारांचे प्रयोग होत राहिले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात रूपेश पवार, प्रियंका ठाकूर अशा नव्या उमेदीच्या लेखक, दिग्दर्शकांमुळे हिंदी नाटकांचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रियंका ठाकूर या गेल्या २०१५ पासून हिंदी रंगभूमीत सक्रिय आहेत. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या प्रियंका यांनी हिंदी थिएटर रुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी ‘मरता क्या ना करता’ या हिंदी विनोदी नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे शहरात केले आहेत. त्यांचे स्वत:चे लेखन व अभिनय असलेल्या ‘झलकारीबाई’ या नाटकाला महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या ‘रोटी वाली गली’ या नाटकाला २०१६ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त आहे. याशिवाय दीनदयाल उपाध्याय व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील महानाट्य त्यांनी लेखन करून साकार केले आहे. प्रियंका यांच्यासह रोशन नंदवंशी ‘कुछ पल जिंदगी के’, सारिका पेंडसे ‘कभी कभी’ या नाट्यकर्मींनीही आपली चुणूक दाखविली आहे, हे विशेष.
रूपेश पवार व राष्ट्रभाषा परिवारचे समीकरण
रूपेश पवार हे नाव आताच्या काळातील प्रतिभावंत तरुण नाट्यकर्मी म्हणून पुढे येत आहे. मंटो आणि ख्वाजा अहमद अब्बास या दोन प्रतिभांची एकत्रित बांधणी करून रूपेशने तयार केलेल्या ‘आणि शेवटी प्रार्थना’ या मराठी नाटकाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मूळचे कामठी येथील रहिवासी असलेले रूपेश गेल्या १५ वर्षापासून राष्ट्रभाषा परिवाराशी जुळले असून नाट्यलेखन व दिग्दर्शनातील त्यांची प्रतिभा बहरून येत आहे. गुलजार यांच्या साहित्यावर रूपेश यांनी ‘खौफ’ हे पहिले हिंदी नाटक बसविले होते. पुढे त्यांनी स्वत: लिहिलेली ‘पतंग, मुंबई स्पिरीट’ व ‘अॅन्ड सो आॅन’ या नाटकांना प्रेक्षकांची पसंती लाभली आहे. नुकतेच त्यांनी तरुण मित्रांना घेऊन ‘मिराकी थिएटर’ची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे त्यांनी ‘मसिहा, कही अनकही’ व ‘तिरीच’ या नाटकांचे प्रयोग केले आहेत. तिरीच या नाटकाला राज्य हिंदी नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. मराठी नाट्य संमेलनाप्रमाणे हिंदी संमेलन ‘भारत रंग महोत्सव’ नागपुरात व्हावे हे त्यांचे स्वप्न आहे.