मोदींसोबतच हिंदू कट्टरपंथी होते ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:02 PM2018-08-30T12:02:19+5:302018-08-30T12:03:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सत्ता संचालित करणारी हिंदू कट्टरपंथी शक्ती नक्षलवाद्यांच्या ‘टार्गेट’वर होती. सव्वा वर्षांपूर्वी नक्षली समर्थक रोना विल्सन यांनी त्यांचे साथी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र पाठवून या योजनेला मूर्तरूप देण्यास सांगितले होते.
जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सत्ता संचालित करणारी हिंदू कट्टरपंथी शक्ती नक्षलवाद्यांच्या ‘टार्गेट’वर होती. सव्वा वर्षांपूर्वी नक्षली समर्थक रोना विल्सन यांनी त्यांचे साथी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र पाठवून या योजनेला मूर्तरूप देण्यास सांगितले होते. या खुलाशामुळे नेत्यांच्या सुरक्षेत तैनात असलेलेल दल आणि गुप्तचर संस्था नव्याने व्यूहरचना तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.
पुणे पोलिसांनी देशातील विविध शहरांमध्ये धाडी टाकून कवी आणि नक्षली समर्थक वरवरा राव याच्यासह पाच लोकांना अटक केली आहे. राव यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली. सूत्रानुसार जून महिन्यात पुणे पोलिसांनी पाच लोकांना अटक केली होती.
त्यांच्याकडून जप्त साहित्य व विचारपूसदरम्यान अनेक खुलासे झाले होते. एक पत्रही पोलिसांच्या हाती लागले होते. यात दहशतवादी संघटना लिट्टे यांनी ज्याप्रकारे मानवी बॉम्बच्या सहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती, त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख होता. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांची विचारपूस करून यासंबंधात माहिती मिळविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठलेही यश हाती आले नाही. सूत्रानुसार तुरुंगात असलेल्या रोना विल्सन यांनी कॉम्रेड प्रकाश यांना १८ एप्रिल २०१७ रोजी हे पत्र लिहिले आहे. प्रकाश सध्या जंगलात नक्षलवादी कारवाया संचालित करीत आहे. या पत्रात म्हटले आहे की,‘मोदींच्या नेतृत्वातील हिंदू कट्टरवादी शक्तींना भयभीत करण्याच्या कामात आम्ही लागले आहोत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पराभव होऊनही मोदींच्या नेतृत्वात १५ पेक्षा अधिक राज्यांमध्ये यश मिळून भाजपचे सरकार बनले. हे असेच सुरू राहिल्यास पार्टीला (पोलिट ब्युरो सेंट्रल कमिटी) सर्व मोर्चांवर त्रास निर्माण होऊ शकतो. हे पार्टीसाठी २०१६ मध्ये सुरक्षा संस्थांद्वारा चालविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘ग्रीन हंट’पेक्षाही अधिक घातक ठरेल. या पत्रात कॉम्रेड किसन आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी ‘मोदीराज’संपविण्याच्या फॉर्म्युल्यावर अमल करण्यास सांगितले आहे. यासाठी राजीव गांधी हत्याकांडाच्या धर्तीवर विचार करण्यास सांगितले आहे. ‘पंतप्रधानांचा रोड शो’ या आॅपरेशनसाठी उपयुक्त असून कुठल्याही परिस्थितीत कसलाही त्याग करून पार्टी जिवंत राहणे सर्वोपरी आहे, असेही त्यात म्हटले आहे.
नागपुरातही आले होते राव
सूत्रानुसार १५ दिवसांपूर्वीच वरवरा राव भविष्यातील योजनांच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने नागपूरलाही आले होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणीही केली होती. यादरम्यान एका स्थानिक नक्षली समर्थकाची भेटही घेतही होती. त्याची पत्नी सध्या तुरुंगात आहे. तीही काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटली आहे. नागपूर दौऱ्यातच नंबर दोनच्या नेत्यांच्या सुटकेवरही चर्चा करण्यात आली. हा नेता नागपूरच्या तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करण्यात आले, परंतु यश आले नाही. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी इतर पर्याय शोधले जात आहेत. पहिला पर्याय ‘नक्षली नेत्यास दुसऱ्या राज्यात शिफ्ट करून जेल ब्रेक करणे’ हा होता. राव यांच्या नागपूर दौऱ्यामुळे स्थानिक पोलिसांचीही झोप उडाली आहे.
७०० पत्रं सापडली
मिळालेल्या माहितीनुसार नक्षल समर्थक असल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या लोकांकडून पोलिसांना ७०० पत्रं सापडली आहे. ते पत्र त्यांनी वेळोवेळी एकमेकांना पाठवलेली आहेत. नक्षली नेते पेनड्राईव्हच्या माध्यमातून ही पत्रं एकमेकांना पाठवत होते. वाचून झाल्यावर ती नष्ट केली जात होती. जप्त करण्यात आलेले कॉम्प्युटर व लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या संशयास पुष्टी मिळाल्याचे सांगितले जाते. पोलीस यांचा पुरावा म्हणून वापर करणार आहे.