बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
By योगेश पांडे | Published: August 16, 2024 08:27 AM2024-08-16T08:27:51+5:302024-08-16T08:28:52+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आले ध्वजारोहण
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बांगलादेशात असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणे एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे. सरकार आपले काम करेलच; मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारताची परंपरा राहिली आहे की आपण जगाच्या उपकाराकरिता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही. जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पीडितांकरिता आपण हे करतो. सरकार हे करीत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्यांना काही कष्ट सोसावे लागू नयेत, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नयेत, याची जबाबदारी एका देशाच्या
नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्यात, असे सरसंघचालक
म्हणाले.
‘नवीन पिढीने स्वातंत्र्याची रक्षा करावी’
- केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १८५७ नंतर ९० वर्षांचा संघर्ष चालला. अनेक प्रकारचे लोक त्यात सहभागी झाले.
- आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले. अगदी सामान्य व्यक्तीदेखील स्वातंत्र्याकरिता रस्त्यावर उतरली.
- अनेक जण जेलमध्ये गेले. अनेकांना कारावास झाला. बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
- आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता रक्षा करायची आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.