हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:08 PM2020-02-01T22:08:15+5:302020-02-01T22:10:05+5:30
पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे. या मार्गावर २८ जानेवारीला प्रवासी सेवा सुरू झाली आहे, हे विशेष.
या डेपोमध्ये रोलिंग स्टॉक विभागाशी संबंधित इमारती असून त्यामध्ये टाइम व सिक्युरिटी कार्यालय, ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्रकल्प, ट्रॅक्शन सबस्टेशन, प्रशासकीय इमारत, ऑक्झिलरी सबस्टेशन, अंडरग्राऊंड ट्रॅक व पंप रूम, मेंटेनन्स इमारत, पीठ व्हील लेंथ, इंजिनिअरिंग ट्रेन युनिट (ईटीयु), आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग तसेच अनलोडिंग प्लॅटफार्मचा समावेश असून या सर्वांचे वेगवेगळे कार्य आहे.
टाइम आणि सिक्युरिटी कार्यालय डेपोच्या प्रवेशस्थानी असून निर्माण कार्य प्रगतिपथावर आहे. संपूर्ण डेपोच्या सुरक्षेची जवाबदारी या कार्यालयावर आहे. ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्रकल्पात रेल्वेची सफाई करण्यात येते. निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. ट्रॅक्शन सबस्टेशन इमारतीच्या माध्यमातून वीज पुरवठा होतो. राज्य वीज वितरण विभागाकडून प्राप्त होणारा ३३ केव्हीचा (किलो व्होल्ट) वीज पुरवठा २५ केव्हीपर्यंत आणला जातो. ऑक्झिलरी सबस्टेशनचा उपयोग डेपोमधील इमारतीद्वारे एलटी पॅनलच्या माध्यमातून वीज पुरवठ्यासाठी होतो. याचे निर्माण कार्य सुरू आहे. पंप रूम इमारतीचा उपयोग डेपो परिसरात असलेल्या इमारतींना पाणी पुरवठ्यासाठी होणार असून हा विभाग विविध इमारतींच्या फायर लाईनशी जोडलेला आहे.
मेंटेनन्स इमारतीचा उपयोग ट्रेनच्या देखरेखीकरिता होणार आहे. तसेच पीठ व्हील लेंथ या इमारतीमध्ये व्हील ओरिएन्टेशन मशीन स्थापित असून या ठिकाणी ट्रेनच्या चाकाची ठराविक कालावधीनंतर चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय इंजिनिअरिंग ट्रेन युनिटमध्ये (ईटीयु) या इमारतीचा उपयोग ट्रॅक मशीन रिरेलिंग साहित्य ठेवण्याकरिता होणार असून सद्यस्थितीत इमारतीचा उपयोग रोलिंग स्टॉकच्या देखरेखीकरिता केला जातो. अनलोंडिंग प्लॅटफार्मचा उपयोग नवीन ट्रेनला रुळावर उतरविण्याकरिता केला जातो. याशिवाय आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग, स्टेबलिंग लाईन्स व बायोडायजेस्टर इमारतीचे निर्माण कार्य वेगात सुरू आहे.