हिंगणा ग्रामीण रुग्णालयास ‘कायाकल्प पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:36+5:302020-12-08T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णसेवेसाठी दिला जाणारा ‘कायाकल्प पुरस्कार’ हिंगणा ग्रामीण रुग्णालयाला मिळाला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णसेवेसाठी दिला जाणारा ‘कायाकल्प पुरस्कार’ हिंगणा ग्रामीण रुग्णालयाला मिळाला आहे. एक लाख रुपयांचे राेख पारिताेषिक पुरस्कार स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या गुणवत्तेत भर पडली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांची गुणवत्ता व रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्याच्या हेतूने कायाकल्प प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात ग्रामीण रुग्णालयाने सहभाग घेतला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय चमूद्वारे परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाला गत तीन वर्षापासून मानांकन प्राप्त झाले होते. मात्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला नव्हता. ६ मार्च २०२० रोजी राज्यस्तरीय परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. रुग्णालयातील परिसर स्वच्छता, विविध सोयीसुविधा, रुग्णांची बैठक व्यवस्था, विनामूल्य आहार, जैवविविधता कचऱ्याची प्रक्रिया, वृक्ष संगोपन, रुग्णसेवेचा दर्जा, रुग्णाच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया, आरोग्य कर्मचाऱ्यांचे अद्ययावत ज्ञान याबाबतचे परीक्षण करण्यात आले. यानंतर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प प्रशंसा पुरस्कार समितीने जाहीर केला.
ग्रामीण रुग्णालयाच्या कार्याला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा रुग्णालय कार्यक्रम समन्वयक डॉ. भागवत राऊत, डॉ. राकेश देबडवार यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालयास हा पुरस्कार मिळाल्याने रुग्णालयाच्या मानांकनात वाढ झाली आहे.