हिंगणघाट जळीत प्रकरण : वर्ध्याचे खासदार पाचव्या दिवशी पीडितेच्या भेटीला, एक महिन्याचे दिले मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:23 PM2020-02-07T14:23:07+5:302020-02-07T14:27:18+5:30
आता हळूहळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर - हिंगणघाट जळीतकांड घटनेच्या पाचव्या दिवशी अखेर वर्धा जिल्ह्याचे खासदार पीडितेच्या भेटीला आले होते. वर्धा जिल्ह्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांची आज नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. आता हळूहळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिंगणघाट घटनेचा निषेध त्यांनी करताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना त्यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिली. तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देखील या संदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी या करिता कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.पीडित तरुणीला केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.