हिंगणघाट प्रकरण : तिच्यासाठी पुढील सात दिवस महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:05 AM2020-02-05T00:05:44+5:302020-02-05T00:07:14+5:30

हिंगणघाटमधील जळीत तरुणीची प्रकृती फार नाजूक आहे. ती ४० टक्के जळाली आहे. २४ तास तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. पुढील सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत, अशी माहिती नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केशवानी यांनी येथे दिली.

Hinganghat Case: The next seven days are important to her | हिंगणघाट प्रकरण : तिच्यासाठी पुढील सात दिवस महत्त्वाचे

हिंगणघाट प्रकरण : तिच्यासाठी पुढील सात दिवस महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देजळीत तरुणीची गृहमंत्री देशमुख व डॉ. केशवानी यांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणघाटमधील जळीत तरुणीची प्रकृती फार नाजूक आहे. ती ४० टक्के जळाली आहे. आगीचा धूर व ज्वाळामुळे श्वसननलिका व फुफ्फुस क्षतिग्रस्त झाले आहे. परंतु किती नुकसान झाले अद्याप सांगणे कठीण आहे. तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, उजवा हात, छाती जळालेली आहे. तिच्या डोळ्यांवर सूज आहे. तिचा आवाज, दृष्टी जाईल का, हेही अद्याप अधिकृतरीत्या सांगता येणार नाही. तिला कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. २४ तास तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. पुढील सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत, अशी माहिती नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केशवानी यांनी येथे दिली.
जळीत प्रकरणातील शिक्षिका मृत्यूशी झुंज देत आहे. नागपुरात ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्या तरुणीची गृहमंत्री अनिल देशमुख व डॉ. केशवानी यांनी भेट घेतली. त्यानंतर डॉ. केशवानी व गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. केशवानी हे यावेळी तासभर हॉस्पिटलमध्ये थांबून होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. तिच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जळीत तरुणी शुद्धीवर आहे. तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर तिने बोट हलवले. हे चांगले संकेत आहेत. तिची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले उपचार समाधानकारक आहेत. यामुळे मुंबईच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रश्न नाही. असे केल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो.
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. केशवानी म्हणाले, नागपूरसारख्या उपराजधानीच्या ठिकाणी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे ‘बर्न सेंटर’ व ‘स्किन बँक’ असणे आवश्यक आहे. यामुळे आणखी अद्ययावत सोय उपलब्ध होऊन रुग्णांना लाभ मिळेल, असेही डॉ. केशवानी म्हणाले.

हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करेल : गृहमंत्री देशमुख
गृहमंत्री देशमुख म्हणाले, अतिशय निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी फास्टट्रॅक न्यायालयात हे प्रकरण चालविण्याचा प्रयत्न राहणार आहे. पीडितेच्या वडिलांच्या मागणीनुसार हे प्रकरण प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविले जाणार आहे. पीडितेवर होणारा आरोग्याचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन उचलणार आहे. अशा घटना होऊच नयेत, कायद्याचा धाक असावा यासाठी आंध्रप्रदेशातील यासंदर्भातील कायद्याचा अभ्यास केला जाईल. तो महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

आरोपीला पेट्रोल टाकून जाळा
जळीत तरुणीची शुश्रूषा करण्यासाठी तिच्या आईवडिलांसह संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहे. ती खाटेवरून उठून आई म्हणून हाक देईल, या प्रतीक्षेत तिची आई तिच्या खाटेजवळ बसून आहे. तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या म्हणाल्या, माझ्या मुलीशी त्याने जसे कृत्य केले तसेच त्याच्या सोबत व्हायला हवे. त्याला पेट्रोल टाकून जाळायला हवे.

Web Title: Hinganghat Case: The next seven days are important to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.