हिंगणघाट : जाळलेल्या तरुणीची स्थिती अद्याप नाजूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:00 AM2020-02-06T01:00:45+5:302020-02-06T01:02:10+5:30
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या तरुणीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या तरुणीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी रुग्णालयातर्फे तरुणीच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार डॉक्टरांची टीम सतत तिच्या स्थितीवर नजर ठेवून असून उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नूरुल अमीन, इंटेंसिविस्ट डॉ. शीतल चव्हाण यांच्या नियंत्रणात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोरे, प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवानवार यांची टीम जखमी युवतीवर उपचार करीत आहेत. बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, बजाज फाउंडेशन, वर्धाचे संजय भार्गव, नागपूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी रुग्णालयात पोहचून पीडित तरुणीच्या आरोग्याची चौकशी केली. पीडितेच्या उपचारासाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपये रुग्णालयात जमा करण्यात आले आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती ४० टक्के जळालेली आहे. गंभीर भाजल्याने तिची श्वसनलिका आणि फुप्फुसांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र किती नुकसान झाले, हे अद्याप सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तरुणीचा चेहरा, गळा, डोके, डावा हात आणि छातीवर चांगलेच भाजले असून डोळ््यांवरही जळाल्याच्या जखमा आहेत. श्वसनलिका जळाल्याने तिला कृत्रिम श्वास दिला जात आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राकाँपा महिला प्रदेशाध्यक्षांनी घेतली पीडितेची भेट
दरम्यान, हिंगणघाटमधील घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून राज्यभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगणघाट येथे पीडितेच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाची सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी पीडित कुटुंबाला दिला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा अर्चना हरडे, शहराध्यक्षा अलका कामळे, लक्ष्मी सावरकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद हरडे, श्रीकांत शिवणकर, योगेश कोठेकर, विशाल खांडेकर, रोशन भिमटे, मेहबूब पठाण, योगेश पर्बत आदी उपस्थित होते.