हिंगणघाट पीडितेचा मारेकरी नागपूर जेलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:26 AM2020-02-13T00:26:52+5:302020-02-13T00:28:23+5:30
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा कारागृहात विकेश याच्या जीवाला धोका असल्याची शक्यता लक्षात घेता वर्धा कारागृह प्रशासनाने नागपूर कारागृहात हलविण्याची विनंती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेत त्याला नागपूर कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला गेला. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा कारागृहात महत्त्वांच्या साक्षीदारासमक्ष विकेश याची ओळखपरेड घेण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन पोलीस व कारागृहातील जवान नागपूरकडे रवाना झाले. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास नागपूर कारागृहात दाखल झाले. विकेश याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तो अन्य कैद्यांच्या संपर्कात येऊ नये, याचीही विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.