हिंगणा पोलीस ठाणे झाले ‘आयएसओ’
By admin | Published: May 16, 2017 02:21 AM2017-05-16T02:21:14+5:302017-05-16T02:21:14+5:30
कार्यकुशलता व सुव्यवस्थेमुळे हिंगणा पोलीस ठाण्याला ‘आएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.
अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव : आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे कर्मचाऱ्यांत उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : कार्यकुशलता व सुव्यवस्थेमुळे हिंगणा पोलीस ठाण्याला ‘आएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाणपत्र प्रदान करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते हिंगणा पोलिसांचा सोमवारी गौरव करण्यात आला. पोलीस ठाण्याला सदर मानांकन मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त एस. दिघावकर, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, आएसओ आॅडिटर नितीन पोहाणे, तहसीलदार प्रताप वाघमारे, पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, वाडीचे सतीश जाधव, सोनेगाव ठाण्याचे संजय पांडे, प्रतापनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड उपस्थित होते.
प्रत्येकाने करीत असलेल्या कार्यामध्ये समाधान मिळेल, अशी विभागणी करण्यात यावी, स्मार्ट पोलीस संकल्पना सर्व मिळून पुढे नेऊ, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त दिघावकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ग्रामीण भागातील शहर पोलीस दलातील पहिले आयएसओ पोलीस ठाणे म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी हिंगणा पोलिसांच्यावतीने उपायुक्त दीपाली मासिरकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी स्मार्ट पोलीस संकल्पनेला साकार करण्यासाठी शहरातील पोलीस ठाणे प्रयत्नरत असल्याचे सांगितले. हिंगणा भागात पोलीस वाहनांची गरज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार हेमंत खराबे यांनी केले. संचालन भारती दवने यांनी केले. आभार एपीआय मोरेश्वर बारापात्रे यांनी मानले. कार्यक्रमाला हिंगणा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.