रेल्वेच्या कंत्राटी कामगारांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:19+5:302021-09-06T04:10:19+5:30
नागपूर : रेल्वेतील कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर घेऊन त्यांना लॉकडाऊनच्या काळातील पगार द्यावा, अशी मागणी रेल्वे कंत्राटी मजदूर युनियनने ...
नागपूर : रेल्वेतील कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर घेऊन त्यांना लॉकडाऊनच्या काळातील पगार द्यावा, अशी मागणी रेल्वे कंत्राटी मजदूर युनियनने केली आहे. त्यासाठी आठ सप्टेंबरला दुपारी १ वाजेपासून संघटनेच्या वतीने संविधान चौकात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वेगाड्या बंद झाल्या. दरम्यान, कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. आता रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कामावरून कमी केलेल्या रेल्वेच्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. भारतात ९४ हजार रेल्वेचे कंत्राटी कामगार आहेत. त्यांना किमान वेतन, वीमा, बोनस, आरोग्य सुविधा, एचआरए, पीएफ आदी सुविधा मिळत नाहीत. रेल्वेचे अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत असल्यामुळे बोगस कागदपत्र सादर करून कंत्राटदार आपले बिल काढत असल्याचा आरोप रेल्वे कंत्राटी मजदूर युनियनने केला आहे. कंत्राटदार कामगारांचे खाते काढतो आणि त्याचे एटीएम आपल्याकडे ठेवतो आणि कामगाराला अर्धा पगार देत असून धरणे आंदोलनात या अन्यायाविरुद्ध लढा देण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष किशोर गेडाम, माया उके, ममता गेडाम, वर्षा वाघमारे, विक्रांत मेश्राम, विनय उके, सुनिल खरुले, विजय चौरसीया, अभिषेक डोंगरे, अंकुश लोखंडे यांनी कळविले आहे.
..........