भाच्याला सात वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: February 23, 2017 02:03 AM2017-02-23T02:03:26+5:302017-02-23T02:03:26+5:30
मामीची चाकू भोसकून हत्या व मामाला गंभीर जखमी करणाऱ्या भाचाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
हायकोर्ट : मामीची चाकू भोसकून हत्या
नागपूर : मामीची चाकू भोसकून हत्या व मामाला गंभीर जखमी करणाऱ्या भाचाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रमोद उर्फ भुऱ्या गंगाराम गजभिये (३०) असे आरोपीचे नाव असून तो झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव छाया पाटील होते. एक दिवस आरोपी व त्याच्या भावाचे भांडण झाले होते. आरोपीचा मामा रामराव व मामी छायाने मध्यस्थी करून भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. परिणामी आरोपीने त्यांच्यासोबतही भांडण केले. त्याने मामा-मामीविषयी मनात राग धरून ठेवला होता. त्यातून २० जून २०१३ रोजी आरोपीने पुन्हा रामराव व छायासोबत भांडण केले. दरम्यान, आरोपीने दोघांवरही चाकूने वार केले. रामराव वार वाचविण्यात यशस्वी ठरला, पण छाया स्वत:ला वाचवू शकली नाही. आरोपीने तिची हत्या केली. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अन्य शिक्षा कायम ठेवली. गिट्टीखदान पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपीतर्फे अॅड. राजेंद्र डागा तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)