बाळ होत नसल्याने पत्नीची बेदम मारहाण करत हत्या
By योगेश पांडे | Published: August 28, 2024 08:39 PM2024-08-28T20:39:23+5:302024-08-28T20:39:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाळ होत नसल्यामुळे वारंवार पत्नीवर संशय घेत तिला बेदम मारहाण करत एका मद्यपी पतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळ होत नसल्यामुळे वारंवार पत्नीवर संशय घेत तिला बेदम मारहाण करत एका मद्यपी पतीने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
साबिरा वर्मा (४०, रामभूमी सोसायटी, विजयनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर बाबुलाल वर्मा (४३) हा आरोपी पती आहे. वर्मा हा मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याचे २० वर्षांअगोदर साबिरासोबत लग्न झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे बाबुलाल संशय घेऊन अनेकदा साबिराला शिवीगाळ करत मारहाण करायचा. काही काळापासून तो दररोजच तिच्याशी वाद घालत होता. मंगळवारी दुपारी त्याने नेहमीप्रमाणे तिच्याशी वाद घातला आणि संतापाच्या भरात तिला बांबूने मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जबर जखम झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. कामगार वसाहत असल्याने बहुतांश जण कामावर गेले होते. रात्री नऊ वाजता साबिराचा पुतण्या थानसिंग उर्फ रुपेश शंकर वर्मा याने बाबुरावला फोन केला व आत्याला फोन देण्याबाबत सांगितले.
तेव्हा बाबुलालने मी तिला ठार मारले असे सांगितले. थानसिंगला तो थट्टा करत असल्याचे वाटले. मात्र तो वारंवार तेच बोलू लागल्याने थानसिंगदेखील हादरला. त्याने बाबुलालच्या शेजाऱ्याला तिकडे जाण्यास सांगितले. वर्माचा शेजारी खिडकीतून डोकावला असता साबिरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. तातडीने कळमना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत साबिराची चाचपणी केली असता तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी बाबुलालला अटक केली.
डोक्याजवळ ठेवला नारळ आणि डोक्याला लावले कुंकू
हत्या केल्यानंतर बाबुलाल साबिराच्या मृतदेहाजवळच बसून होता. त्याने साबिराच्या डोक्याला कुंकू लावले व डोक्याजवळ नारळ ठेवला होता. त्याने तिचा मृतदेह कापडाने झाकून ठेवला होता. लोकांनी वारंवार म्हटल्यावरदेखील त्याने दरवाजा उघडला नाही. तो पाच ते सहा तास मृतदेहाजवळ बसून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अनेकदा दिली होती जीवे मारण्याची धमकी
बाबुलाल हा नेहमी दारुच्या नशेत रहायचा व त्याने साबिराला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती नेहमी तणावात रहायची. तिने माहेरीदेखील याची कल्पना दिली होती. त्यामुळेच थानसिंग तिला नियमितपणे फोन करून तिची विचारपूस करायचा.