ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशन अभ्यासक्रमात आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:52+5:302020-12-29T04:07:52+5:30
निशांत वानखेडे नागपूर : देशाचा स्वातंत्र्य लढा आणि राजकीय वाटचालीचा विचार केल्यास १९२० साली नागपूर येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन ...
निशांत वानखेडे
नागपूर : देशाचा स्वातंत्र्य लढा आणि राजकीय वाटचालीचा विचार केल्यास १९२० साली नागपूर येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले. देशाच्या पटलावर महात्मा गांधी यांचे नेतृत्व असाे किंवा स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेली असहकार चळवळ, ही नागपूर अधिवेशनाचीच फलश्रुती ठरली. भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पाच हाेता. त्यामुळे भावी पिढीला हा इतिहास माहीत असणे अगत्याचेच आहे. हेच महत्त्व लक्षात घेत बीए आणि एमएच्या इतिहास अभ्यासक्रमात या ऐतिहासिक अधिवेशनाचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डाॅ. श्याम काेरेट्टी यांनी लाेकमतशी बाेलताना याबाबतचे अनेक संदर्भ सादर केले. तसे नागपूर अधिवेशनाचा इतिहास बहुतेक लेखकांच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळताे. २००३ साली नागपूरच्या त्रिशताब्दीनिमित्त काढलेल्या ग्रंथात या सुवर्णक्षणांचा उल्लेख करण्यात आला. मात्र अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही या अधिवेशनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील जवळपास सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना नागपूर अधिवेशन अभ्यासणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढ्यातील उदय सर्वमान्य हाेण्यास नागपूर अधिवेशन कारणीभूत ठरले. याशिवाय देशभरात पेटलेली असहकार चळवळ ही नागपूर अधिवेशनाचीच देण. त्यामुळे हे दाेन्ही संदर्भ अभ्यासण्यासाठी नागपूर अधिवेशन डाेळ्यासमाेरून घालणे विद्यार्थ्यांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.
डाॅ. काेरेट्टी यांच्या मते, नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच स्वातंत्र्य आंदाेलनाच्या इतिहासात नागपूर अधिवेशनाचा उल्लेख अभ्यासक्रमात हाेता. युजीसीच्या सूचनेनुसार देशातील अभ्यासक्रमातही ते अंतर्भूत हाेते. तसा ताे राज्यातील अभ्यासक्रमातही आला. विशेष धडा नसला तरी गांधी उदय व असहकार चळवळ अभ्यासताना त्याचा समावेश हाेताे. मात्र नागपूर विद्यापीठात ताे अधिक व्यापक रूपात समाविष्ट करण्यात आला. कला शाखेत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात अधिवेशन समाविष्ट झाले. डाॅ. काेरेट्टी म्हणाले, राष्ट्रीय स्तराचा इतिहास अभ्यासताना स्थानिक घडामाेडीलाही महत्त्व असते. त्यानुसार एमएच्या द्वितीय वर्षात नागपूर अधिवेशनाच्या इतिहासाला स्वतंत्र स्थान मिळाले. आधी वार्षिक पॅटर्न हाेता, ताे आता सेमिस्टरनुसार झाला. त्यानुसार एमएच्या चाैथ्या म्हणजे अंतिम सेमिस्टरला स्वातंत्र्य लढ्यातील विदर्भाच्या इतिहासात नागपूर अधिवेशन स्वतंत्रपणे व सविस्तर घेतले गेले.
गांधी उदय, असहकार चळवळ या महत्त्वाच्या मुद्यासह स्वदेशीचा आग्रह, काैमी एकता, अस्पृश्यता निवारणाचा प्रस्ताव, स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग असे अनेक कांगाेरे नागपूर अधिवेशनाला आहेत, जे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महत्त्वाचे आहेत. अधिवेशनात पारित झालेले २३ प्रस्ताव स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे बिंदू ठरले. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ असलेले हे अधिवेशन अभ्यासक्रमात येणार नाही तर नवल.
- डाॅ. श्याम काेरेट्टी, इतिहास विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ