ऐतिहासिक निकाल : क्रूरकर्मा संजय पुरीला तिहेरी फाशी

By नरेश डोंगरे | Published: June 3, 2024 09:24 PM2024-06-03T21:24:57+5:302024-06-03T21:25:05+5:30

कळमेश्वर तालुक्यातील बहुचर्चित घटना; चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार केल्यानंतर केली होती निर्घृण हत्या

Historic result: Sanjay Puri triple hanging for brutal crime | ऐतिहासिक निकाल : क्रूरकर्मा संजय पुरीला तिहेरी फाशी

ऐतिहासिक निकाल : क्रूरकर्मा संजय पुरीला तिहेरी फाशी

नागपूर: पाचवर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा आणि नंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा संजय पुरी (३७) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयाने तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात ६ डिसेंबर २०१९च्या सायंकाळी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती.

लिंगा हे गाव एका शेतामुळे दोन वस्तीत विभागले गेले आहे. गावाच्या एका भागात पाचवर्षीय चिमुकली चिनू (काल्पनिक नाव) आईवडिलांसह राहत होती. तर, दुसऱ्या भागात तिच्या आजीचे घर होते. फक्त शेतच आडवे असल्याने इतरांप्रमाणे तीसुद्धा इकडून तिकडे येणे-जाणे करीत होती. ६ डिसेंबर २०१९ ला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ती तिच्या आजीच्या घरी जात होती. क्रूरकर्मा संजय पुरीची तिच्यावर नजर पडताच त्याने तिला उचलून घेतले. शेताच्या कोपऱ्यावर नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ती वेदनांनी ओरडत असताना राक्षसी वृत्तीच्या संजय पुरीने दगडाने डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली. क्रूरकर्मा संजय पुरीच्या क्रौर्याला बळी पडलेल्या चिमुकलीचा मृतदेह रात्रभर तसाच पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आपल्या मुलीच्या घरी आली आणि चिनू कुठे आहे, असे विचारले, त्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे लक्षात झाले.

चिमुकली बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने पूर्ण गावच तिचा शोध घेण्यासाठी कामी लागले. मात्र, चिनू काही आढळली नाही. परिणामी ७ डिसेंबरला कळमेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. दोन दिवस होऊनही बेपत्ता चिमुकलीचा पत्ता लागत नसल्याने तिसऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा ताफा गावात पोहचला. त्यावेळी आरोपी संजय पुरीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. बाजीरावचे फटके पडताच त्याने चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचे आणि मृतदेह गावातीलच भारती यांच्या शेतात टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. ही वार्ता पंचक्रोशीत पसरताच प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ठिकठिकाणच्या हजारो गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलिस ठाण्यावर धडक देऊन आरोपीचे एन्काउंटर करण्याची जोरदार मागणी केली. त्यावेळचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कशीबशी संतप्त जमावाची समजूत काढली.

दरम्यान, शेवंता शांताराम भलावी (रा. लिंगा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय पुरीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार अपहरण, बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी अशोक सरंबळकर, पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, एएसआय सपाटे, एएसआय कडबे यांनी मृत चिमुकलीच्या रक्ताचे डाग आरोपीच्या कपड्यांवर आढळल्याचा डीएनए रिपोर्ट तसेच भक्कम पुराव्यासह ४ फेब्रुवारी २०२० ला या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात विशेष सरकारी वकील ॲड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी २७ साक्षीदारांनी साक्ष नोंदवत जोरदार युक्तिवाद करून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. न्या. एस. आर. पडवळ यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांचे बयाण आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे या प्रकरणात तिहेरी फाशीचा ऐतिहासिक निकाल दिला.
----------------
तीन गुन्ह्यात तीन फाशीची शिक्षा
या संबंधाने विशेष सरकारी वकील ॲड. सत्यनाथन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, न्यायालयाने या गुन्ह्यातील क्रूरता अधोरेखित करून चिमुकलीची हत्या केल्याच्या आरोपात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. ती अल्पवयीन असतानादेखील त्याने तिच्यावर बलात्कार केल्यामुळे त्याला फाशी सुनावली आणि पोक्सो कायद्याचे कलम ६ (ब) अन्वयेदेखील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
-----------------
रिवॉर्ड देणार : एसपी हर्ष पोद्दार
क्रूरकर्मा संजय पुरीला तीन गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली. पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून भक्कम पुरावे गोळा केल्यामुळे आणि सरकारी पक्षाने अत्यंत प्रभावी युक्तिवाद केल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे आपण तपास पथकाला तसेच पैरवी करणाऱ्यांना रिवॉर्ड घोषित करणार असल्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Historic result: Sanjay Puri triple hanging for brutal crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.