भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते, निवृत्त सेनाध्यक्ष मनोज पांडे यांचं विधान
By नरेश डोंगरे | Published: October 5, 2024 11:46 PM2024-10-05T23:46:51+5:302024-10-05T23:47:22+5:30
Nagpur News: भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते आहे. सीताबर्डी किल्ला, कामठी कॅन्टोनमेंट आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी ही त्याची उदाहरणं ठरावीत, असे प्रतिपादन निवृत्त सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांनी केले.
नागपूर - भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते आहे. सीताबर्डी किल्ला, कामठी कॅन्टोनमेंट आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी ही त्याची उदाहरणं ठरावीत, असे प्रतिपादन निवृत्त सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांनी केले.
नागभूषण अवार्ड फॉउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नागभूषण पुरस्कार २०२४ साठी जनरल पांडे यांची तर युवा नागभूषण पुरस्कारासाठी आंतराष्ट्रीय बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिची निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये शनिवारी रात्री पार पडला. या सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून जनरल पांडे बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दुसरी सत्कारमुर्ती दिव्या देशमुख, फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. अजय संचेती, सचिव निशांत गांधी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सेनाध्यक्ष म्हणून अतुलणीय कामगिरी बजाविणाऱ्या जनरल पांडे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभापासूनच विनम्रता अन् साैजन्यशिलतेचा परिचय देत उपस्थितांना आपलेसे केले. वयाच्या १७ व्या वर्षीपासून आपल्या सैनिकी जिवनाची सुरूवात झाल्याचे सांगून त्यांनी भारतीय सैन्याच्या तीनही विंग जगात प्रबळ, सक्षम अन् परिवर्तनशिल म्हणून ओळखल्या जातात, असे सांगितले. सैनिकी यशाचे गमक उलगडताना त्यांनी 'नाम, नमक आणि निशान'चे विश्लेषण केले. तरुणांना उद्देशून शिस्त, चिकाटी, धैर्य आणि कठीण परिश्रमाची तयारी ठेवून स्वत:त लिडरशिप तयार करा, असा हितोपदेश दिला. येणाऱ्या अडचणींकडे संधी म्हणून बघितल्यास आपण कधीच मागे राहत नाही, असे सांगत त्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्याचा माैलीक सल्लाही तरुणाईला दिला.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सत्कारमुर्ती जनरल पांडे आणि दिव्या देशमुख यांचे भरभरून काैतुक केले. दिल्लीत असताना पांडे यांच्याबाबत नेहमी संबंधितांकडे आपण चाैकशी करायचो आणि प्रत्येक जण 'मनोज बहोत अच्छा लडका है' असे म्हणायचे, त्यावेळी आपल्याला खूप अभिमान वाटायचा, असे गडकरींनी सांंगितले. त्यांनी नागपूरचे नाव देश-विदेशात उंचावणाऱ्या जस्टीस सिरपूरकर, चिफ जस्टीस बोबडे, माजी उपराष्ट्रपती हिदायततुल्ला यांचाही यावेळी गाैरवाने उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक फॉउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती, स्वागतपर भाषण विलास काळे, सत्कारमुर्तींचा परिचय निशांत गांधी यांनी तर आभार प्रदर्शन कुमार काळे यांनी केले.
'चॉकलेट'च्या गोडीमुळे दुणावला विश्वास
बुद्धीबळाच्या सारिपाटावर अनेक नामवंतांना चाट पाडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा झेंडा रोवणारी ख्यातनाम बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात उपस्थितांसमोर उघड केली. समोर बसून असलेल्या बहिणीकडे बोट दाखवित ती म्हणाली, ताईच्या बॅडमिंटन क्लासला लागून बुद्धीबळाचा क्लास होता. मी तेथे नेहमी डोकावून बघत होती. क्लासच्या संचालकांनी हे हेरले. त्यांनी बाबांशी चर्चा करून मला क्लासमध्ये घेतले. त्यावेळी मी चार-पाच वर्षांची होती. तास-न-तास बसून शिकणे शक्य नव्हते. मात्र, जास्तीत जास्त वेळ क्लासमध्ये बसल्यास बाबा चॉकलेट द्यायचे. त्यातून गोडी वाढली अन् पहिल्याच स्पर्धेत पुरस्कार पटकावला. तेव्हापासून आपण प्रत्येक मॅच जिंकू शकतो, हा विश्वास वाढत गेल्याचे म्हणत, दिव्याने आपल्या यशाचा सारिपाट उलगडला.