वशिष्ठ ऋषींनी भक्ती व उपासनेकरिता स्थापन केलेला केळझरचा ऐतिहासिक सिद्धिविनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:55 AM2023-09-26T11:55:32+5:302023-09-26T12:06:34+5:30

विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले गणराज म्हणजे केळझरचे सिद्धिविनायक

Historical Siddhivinayak of Kelzar founded by Sage Vashishtha for devotion and worship | वशिष्ठ ऋषींनी भक्ती व उपासनेकरिता स्थापन केलेला केळझरचा ऐतिहासिक सिद्धिविनायक

वशिष्ठ ऋषींनी भक्ती व उपासनेकरिता स्थापन केलेला केळझरचा ऐतिहासिक सिद्धिविनायक

googlenewsNext

केळझर (नागपूर) : केळझर हे गाव टेकड्यांच्या कुशीत वसलेले असल्याने मंदिराला निसर्गाचा लौकिक प्राप्त झाला आहे. हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. या गणपतीची स्थापना श्रीरामचंद्र प्रभूंचे गुरू वशिष्ठ ऋषींनी स्वतःच्या भक्ती व उपासनेकरिता केली असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.

केळझर हे गाव वर्धा ते नागपूर मार्गावर वर्ध्यापासून २७ किलोमीटर तर नागपूरपासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे. भाविकांना येथे येण्याकरिता एसटी बस आणि ट्रॅव्हल्सची सुविधा आहे. येथील वरदविनायकाची मूर्ती चार फूट सहा इंच उंच असून तिचा व्यास चौदा फूट आहे. अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे. टेकडीवर मंदिर परिसर असल्याने निसर्गसौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.

या मंदिराला शासनाने पर्यटन क्षेत्राचा ‘क’ दर्जा दिल्याने शासकीय निधीतून विविध विकासकामे केली जात आहेत. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस मंदिराचे अध्यक्ष माधवराव इरुटकर व सचिव महादेवराव कापसे यांनी व्यक्त केला. या मंदिरात बाराही महिने भाविकांची गर्दी बघायला मिळते. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वैशाख महिन्यात जोगेश्वर महाराज स्मृतीनिमित्त सप्ताह, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी उत्सव, अश्विन महिन्यात नवरात्री उत्सव, कार्तिक महिन्यात कार्तिक मास उत्सव, पौष महिन्यात एकदिवसीय यात्रा महोत्सव, माघ महिन्यात गणेश जयंती, महालक्ष्मी उत्सव आणि संत गजानन महाराज प्रगट दिन आदी उत्सव साजरे केले जातात.

असा आहे येथील इतिहास

केळझरचे नाव महाभारत काळात एकचक्रनगर होते. या एकचक्रनगरीत कुंतीपुत्र पांडव वास्तव्याला असताना बकासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे. वर्धा-नागपूर मुख्य महामार्गावर अग्नेय बाजूला बौद्धविहाराच्या समोर बकासुर राक्षसाचे मैदान, तोंड्या राक्षस म्हणून प्रचलित आहे. येथील टेकडीला वकाटकाच्या काळापासून भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. या किल्ल्याला पाच बुरुज व माती दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून, त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात. बरेचसे भाविक या विहिरीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले इतिहासाप्रमाणे भोसले राजे कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्कामी राहिल्याची नोंद आहे.

ऐतिहासिक एकचक्रनगर

वशिष्ठ पुराणामध्ये व महाभारतामध्ये केळझर गावाचे नाव एकचक्रनगर असल्याचा उल्लेख आहे. वशिष्ठ पुराणाप्रमाणे श्रीरामचंद्र प्रभूंचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य असल्याची नोंद असून, ऋषींनी स्वतःच्या भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली आहे. त्यानंतर याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरदविनायक व वर्धा नदीचे नाव वरदा असल्याचे कळते. हा काळ श्रीरामजन्माच्या पूर्वीचा असून श्रीरामजन्मानंतर श्री वशिष्ठ ऋषींनी येथील वास्तव्य सोडले.

Web Title: Historical Siddhivinayak of Kelzar founded by Sage Vashishtha for devotion and worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.