महात्मा गांधी यांच्यामुळे जनतेचा इतिहास लिहिला गेला : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:35 PM2018-10-02T21:35:21+5:302018-10-02T21:36:20+5:30
भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
सर्वोदय आश्रम नागपूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी एक दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे व ज्येष्ठ अधिवक्ता आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या शब्दांमध्ये मंत्रशक्तीचा अंतर्भाव होता. त्यामुळे त्यांच्या एका शब्दावरून विद्यार्थ्यांनी शाळा, वकिलांनी वकिली व नोकरदारांनी नोकऱ्या सोडल्या होत्या. हजारो नागरिक तुरुंगात गेले होते. करा किंवा मरा हा नारा दिल्यानंतर जनता मरण्यासाठी तयार झाली होती. महात्मा गांधी राजा, धर्मगुरू किंवा सेनापती नव्हते. ते एक सामान्य नागरिक होते. परंतु, कष्टातून मिळविलेले आत्मबळ व आत्मबळातून प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. कठोर तत्त्ववादीपणा हे त्यांच्या स्वभावाचे मोठे वैशिष्ट्य होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी जनतेला एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर देशभरातून ९७ लाख रुपये जमा झाले होते. परंतु, केवळ तीन लाख रुपये कमी मिळाले म्हणून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली नव्हती. तसेच, निर्धारित वेळेत संपूर्ण रक्कम प्राप्त झाली नाही तर, मिळालेली रक्कमही संबंधितांना परत करण्यात यावी असे त्यांनी सांगितले होते. रक्कम कमी मिळणे याचा अर्थ जनतेचा आपल्यावर विश्वास नाही असा होतो असे ते म्हणाले होते. या तत्त्वामुळे महात्मा गांधी यांनी जनतेच्या मनात घर केले. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असे द्वादशीवार यांनी पुढे बोलताना सांगितले.
तत्पूर्वी शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांचे ‘भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाचे स्वरूप’ विषयावर तर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. म. भा. निसळ यांचे ‘खरा विकास कशाला म्हणायचे’ विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. कल्पना उपाध्याय यांनी संचालन केले तर, वंदन गडकरी यांनी आभार मानले.