ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:03 AM2017-08-14T02:03:02+5:302017-08-14T02:03:28+5:30
बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला. अशाप्रकारे दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचेही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. मात्र ब्राह्मण्यवादी आणि ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी इतिहासात या नायकांची दखल घेतली नाही व त्यांचे कर्तृत्व जाणीवपूर्वक झाकून ठेवले. म्हणूनच ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण असल्याचे रोखठोक मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
आदिवासी समाजातील विचारवंत, लेखक व राष्टÑपती पुरस्कारप्राप्त डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘बिरसा मुंडा धरती आबा : जनचेतनेचे विद्रोही रूप’ आणि ‘निर्मला पुतुल और वाहरू सोनवणे की आदिवासी कविताएं : तुलनात्मक अध्ययन’ या दोन ग्रंथांचा लोकार्पण सोहळा रविवारी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग येथे पार पडला.
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, गिरीश गांधी, जेष्ठ कवी सुधाकर गायधनी, आदिवासी कवी वाहरू सोनवणे, राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, नव्या साम्राज्यवादी व भांडवलशाही धोरणात विकास व आधुनिकतेच्या नावावर आदिवासींना जंगलातून हाकलून त्यांचे शोषण क रण्याची नवी परंपरा रुजविण्यात येत आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गंगाधर पानतावणे यांनी, भांडवलशाही आणि सरंजामशाहीपेक्षाही देशात सांस्कृतिक आणि सामाजिक दहशतवाद अधिक धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. मधुकर पिचड यांनी यावेळी आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणाºया धनदांडग्यांविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगत, शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले.
डॉ. विनायक तुमराम यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त करताना मराठी साहित्य क्षेत्राने आदिवासी साहित्याची हवी तशी दखल न घेतल्याची खंत व्यक्त केली.