दोन वर्षांत पाठ्यपुस्तकांमधील इतिहास बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 02:53 AM2016-05-23T02:53:41+5:302016-05-23T02:53:41+5:30
आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे.
सुब्रमण्यम् स्वामी : महर्षी नारद जयंतीनिमित्त पत्रकार पुरस्कारांचे वितरण
नागपूर : आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे. हा इतिहास बदलविण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असून येत्या दोन वर्षांत इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केले. महर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे.नंदकुमार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित व विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक उपस्थित होते. आपल्या देशात अगदी आर्य काळापासूनचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. देशात अनेक शूरवीर होऊन गेले. हिंदूंनी गेल्या हजारो वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष केला असताना मुघलांच्या इतिहासाचे धडेच्या धडे आहेत. हे अयोग्य असून यात बदल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. मुळात नोकरीसाठी पत्रकारितेची पदवी ही अट ठेवायलाच हवी आणि कायद्याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे असे डॉ.स्वामी म्हणाले. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. परंतु चित्रपट आणि मालिकांमधून त्यांची प्रतिमा विनोदात्मक पद्धतीची करण्यात आली. काही लोकांनी जाणुनबुजून असे केले असा आरोप जे.नंदकुमार यांनी लावला. यावेळी बबन वाळके आणि जयेश जग्गड यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय विश्व संवाद केंद्राचे सहप्रमुख प्रसाद बर्वे यांनी लिहिलेल्या ‘देवर्षी नारद : जीवन आणि कार्य’ या पुस्तकाचेदेखील प्रकाशन करण्यात आले. सुधीर पाठक यांनी प्रास्ताविक केले. नीलय चौथाईवाले यांनी संचालन केले तर प्रसाद बर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)