रेस्टॉरंट, धाब्यावर दारू रिचवतात अन् धुंदीत गाडी चालवून लोकांना चिरडतात
By नरेश डोंगरे | Published: June 20, 2024 07:14 PM2024-06-20T19:14:42+5:302024-06-20T19:15:18+5:30
- हिट ॲन्ड रन : एक्साईजची अर्थपूर्ण डोळेझाक, कारवाईच्या नावाने नुसतीच खानापूर्ती
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शहरात असू दे किंवा शहराबाहेर परवाना नसतानाही अनेक रेस्टॉरंट, धाब्यावर बिनधास्त दारू मिळते. तेथे दारू रिचविल्यावर बेदरकारपणे गाडी चालविली जाते. त्यामुळे नंतर हिट ॲन्ड रनचे प्रकार घडतात. शहरात सध्या असे प्रकार वाढले आहेत. कुणाचा जीव जात आहे तर कुुणी वेदना घेऊन जगत आहेत. मात्र, या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यावर अर्थपूर्ण झापड लावून घेतले आहे. कारवाईच्या नावाखाली ही मंडळी नुसतीच खानापूर्ती करीत असल्याची चर्चा आहे.
शहराच्या आत आणि बाहेरच्या मार्गावर जागोजागी रेस्टॉरंट आणि धाबे वाढले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवाना नसताना दारू उपलब्ध करून दिली जाते किंवा दारू पिण्याची व्यवस्था करून दिली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी तरुण-तरुणींची मोठी गर्दी दिसून येते. उशिरा रात्रीपर्यंत तेथे यथेच्छ दारू पिल्यानंतर ही मंडळी रेस लावल्यासारखी वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होतो. त्यानंतर दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला, असा प्रकार घडतो. निरपराध व्यक्तींचा जीव जातो. त्यांच्या नातेवाइकांना आयुष्यभर सलेल अशी जखम होते आणि अपघात करणारी बेजबाबदार मंडळी पोलिसांकडून खानापूर्ती झाल्यानंतर काही तासांतच जामिनावर बाहेर येते. अपघात कितीही गंभीर असला तरी अलीकडे त्यात जामीन मिळतो, हे सर्वांना माहिती झाले म्हणून की काय, काही वाहनचालक मुद्दामहून दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवितात.
परवाना नसताना कुठे दारू उपलब्ध करून दिली जात असेल किंवा दारू पिण्याची सोय करून दिली जात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र, ही मंडळी या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचे जाणवते. या संबंधाने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आमच्या नियमित कारवाया सुरू असतात, असे ते म्हणतात.
तरच अपघाताला आळा घालता येईल
सिग्नल बंद असताना आणि सुरू असलेल्या सिग्नलकडून दुसरे वाहनचालक येताना दिसत असूनही दारूच्या नशेत असलेले काही बेदरकार वाहनचालक आपली गाडी पुढे दामटतात. त्यांच्याकडे सहज बघितले तरी ते गाडीतूनच 'क्या देख रहा...' अशी उर्मट विचारणा करून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात. शहरात असे प्रकार जवळपास रोजच घडतात. 'जाऊ द्या, कशाला कटकट करायची', असे स्वत:ला समजावत अनेक वाहनचालक निघून जातात. अशा दारूड्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी रात्रीच्या वेळी शहराच्या आत आणि बाहेर, रस्त्यारस्त्यावर ड्रंक न ड्राईव्ह कारवाईच्या धडक मोहिमेची गरज आहे. असे झाले तरच अपघाताला आळा घालता येईल.