नागपुरात 'हिट अँड रन'ची दाहकता कायम, वर्षभरात १३५ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:06 IST2025-01-10T17:04:13+5:302025-01-10T17:06:12+5:30
नागपूरकरांची माणुसकी हरवतेय का? : अजनी, एमआयडीसी झोन सर्वांत धोकादायक

Hit and run incidents continue in Nagpur, 135 people lost their lives in a year
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांत नागपूरमध्ये प्राणघातक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे 'हिट अँड रन'ची अमानवीय प्रवृत्तीदेखील वाढते आहे. मागील वर्षात वाहनचालकांच्या 'हिट अँड रन'मध्ये सुमारे १३५ जणांनी जीव गमावला. जर अपघात झाल्यावर आरोपींनी थांबून त्यांना रुग्णालयात नेण्यास वेळेत मदत केली असली तरी यातील अनेकांचे जीव वाचू शकले असते.
'हिट अँड रन'वर नियंत्रण नाहीच
२०२३ मध्ये 'हिट अँड रन'चे १३६ प्राणांतिक अपघात झाले होते व त्यात १४६ जणांचा मृत्यू झाला होता. तर २८ जण गंभीर जखमी झाले होते. मागील वर्षभरात पोलिस अधिकाऱ्यांकडून विविध दावे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हिट अँड रन'वर कुठलेच नियंत्रण नसल्याची बाब समोर आली.
झोननिहाय हिट अँड रनमधील मृत्यू
झोन २०२३ २०२४
एमआयडीसी ३२ २४
सोनेगाव ९ ४
अजनी २३ २३
सक्करदरा १२ १८
कामठी १९ १६
इंदोरा १५ २०
सदर १३ १२
कॉटन मार्केट ७ ४
लकडगंज ४ ३
सीताबर्डी १२ ८
धनाढ्यांच्या मस्तीत निष्पापांचा बळी
हिट अँड रन'चे प्रमाण रात्रीच्या सुमारास जास्त दिसून येते. मद्याच्या नशेत भरधाव वाहने चालविताना काही धनाढ्य चक्क शर्यत लावताना दिसून येतात. यातूनच मागील वर्षी रामझुल्यावर रितिका मालूने दिलेल्या धडकेत दोन गरीब तरुणांना जीव गमवावा लागला होता. तर दारूच्याच नशेत दिघोरी टोल नाक्याजवळ फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना धनाढ्यांच्या मुलांनी चिरडत जीव घेतला होता. एखादा अपघात झाल्यावर जखमीला तातडीने मदत करणे अपेक्षित असते. मात्र कारवाईच्या भीतीने त्याला मृत्यूच्या दाढेत टाकून आरोपी फरार होता. परिणामी 'गोल्डन अव्हर' मध्ये उपचार न मिळाल्यामुळे बहुतांश जणांचा जीव जातो.