डॉ.वेदप्रकाश मिश्रांची दणक्यापूर्वीच शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 08:53 PM2018-02-21T20:53:04+5:302018-02-21T20:56:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. दुसरीकडे विद्यापीठाने मात्र डॉ.मिश्रा यांना अशाप्रकारे पदवी परत करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा केला आहे. नियमांत अशी तरतूद नसून विद्यापीठ पदविका काढून घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले.
हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांना १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता ही मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहावे लागणार आहे. जर ते उपस्थित झाले नाही, तर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ.मिश्रा यांनी बुधवारी कुलगुरूंना एका व्यक्तीच्या माध्यमातून पत्र पाठविले. ही पदविका आपण परत करत असल्याचे यात नमूद करण्यात आले. आपण पदविका प्रमाणपत्र विद्यापीठातून घेतले नसल्याचेदेखील त्यांनी यात नमूद केले.