अवैध उत्खनन करणाऱ्या केसीसी कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:04+5:302021-02-10T04:08:04+5:30

हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मौजा कवडस आणि मौदा पेंढरी येथील खदाणीतून गौण खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी, नागपूर येथील ...

Hit KCC company for illegal excavation | अवैध उत्खनन करणाऱ्या केसीसी कंपनीला दणका

अवैध उत्खनन करणाऱ्या केसीसी कंपनीला दणका

Next

हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मौजा कवडस आणि मौदा पेंढरी येथील खदाणीतून गौण खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी, नागपूर येथील खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनीला (केसीसी) ३४ कोटी ९५ लाख १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस तहसीलदार संतोष खांडरे यांनी बजावली आहे. या प्रकरणी कंपनी मालक निहार जयंत खळतकर यांच्यासह संजय चंद्रशेखर इंगळे यांना हिंगणा तहसील कार्यालयात ११ फेब्रुवारी रोजी आवश्यक कागदपत्रासह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कवडस शिवारात असलेल्या गिट्टी खदाणीतून आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी येथे धाड टाकली होती. या कंपनीला शेत सर्वे नं. २२५/१ मधील २.८० हेक्टर आर क्षेत्रामध्ये २८ हजार ब्रास दगड, मुरुम, बोल्डर या गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. येथे मात्र, ५८,०७६.८५ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे तपासणी अंती दिसून आले आहे. येथे सदर कंपनीने ३०,०७७ ब्रास अवैध गौण खनिजाचा उपसा केला आहे. या प्रकरणी सदर कंपनीवर ३० कोटी ०७ लाख ७० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

यासोबतच मौजा पेंढरी येथील सर्व्हे नंबर ९२ मधून ७,६०० ब्रास मुरुम खोदकाम व वाहतुकीची परवानगी सदर कंपनीकडे होती. येथे १७,३४८.४७ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. या खदाणीतून ९७४८.४७ ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या संदर्भातील नोटीस खळतकर यांना बजाविण्यात आली आहे. उपरोक्त नोटिसीवर सदर कंपनीने पुराव्यासह लेखी उत्तर सादर न केल्यास, त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६चे कलम ४८ (७) अन्वये दंडात्मक कारवाई करण्याचे तहसीलदार खांडरे यांनी स्पष्ट केले आहे. सदर कारवाई पथकात नायब तहसीलदार ज्योती भोसले, महादेव दराडे, मंडळ अधिकारी वैभव राठोड, तलाठी गायगोले, अनुजा मोहिते, अरुण गडपायले, जी. एम. डेकाटे यांनी सहभाग घेतला.

---

केसीसी कंपनीला नोटीस बजावण्यापूर्वी मोक्यावर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष टेपद्वारे मोजणी करण्यात आली, तसेच जी.पी.एस. मोजणी तंत्रज्ञानाद्वारे व ई.टी.एस. मोजणी तंत्रज्ञानाद्वारे मोजणी करून करण्यात आलेल्या अवैध खोदकामाची खातरजमा करण्यात आली आहे. आकारण्यात आलेली दंडाची रक्कम योग्य आहे.

- संतोष खांडरे, तहसीलदार, हिंगणा

Web Title: Hit KCC company for illegal excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.