'हिट न रन'चा आक्रोश, जखमींना मरणयातना अन् पोलिसांचा थंडपणा
By नरेश डोंगरे | Published: May 28, 2024 10:01 PM2024-05-28T22:01:36+5:302024-05-28T22:08:06+5:30
तीन आठवड्यांपूर्वी अपघात : सीसीटीव्हीचे सर्वत्र जाळे, मात्र पोलिसांना कारचा नंबरच सापडेना
नागपूर: सकाळी फिरायला निघालेल्या दोन महिलांना बेदरकार कार चालक उडवतो. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना तो मस्तवाल कार चालक पुढे निघून जातो. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदवली जाते. दरम्यान, या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला पैशाअभावी घरीच मरणयातना भोगाव्या लागत आहेत. दुसरीकडे, सीसीटीव्हीचे प्रशस्त नेटवर्क असलेल्या स्मार्ट सिटीतील पोलिसांना तीन आठवडे होऊनही आरोपी सोडा, त्याच्या कारचा नंबरही सापडलेला नाही. पोलिसांच्या थंडपणाचा संतापजनक नमुना ठरणारे हे प्रकरण गिट्टीखदानमधील आहे.
७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या दरम्यान गिट्टीखदानमधील ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघी मैत्रिणी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. शिवाजी चाैकातील एका दुकानाजवळून जात असताना मागून वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने ममता आणि वंदनांना जोरदार धडक दिली. या दोघी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्या. ते पाहून दोन तरुण कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, कार चालक बेदरकारपणे पळून गेला. अत्यंत गंभीर अवस्थेत ममता आणि वंदनांना उपचारासाठी आधी गिट्टीखदानमधील खासगी रुग्णालयात आणि नंतर जामठा जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दोन्ही महिला सर्वसाधारण परिवारातील असून, विधवा आहे. होते नव्हते ते जवळचे सर्व विकवाक करून नातेवाइकांनी उपचार केले. मात्र, डॉक्टरांकडून वारंवार उपचाराची मोठी रक्कम मागितली जात असल्याने पर्याय नसल्यामुळे अखेर ममता यांना नातेवाइकांनी घरी आणले. पैशाअभावी त्या आता आक्रोश करीत मरणयातना सहन करीत आहेत. कंत्राटी बेसवर त्या मूकबधिर मुलांना शिकवून दोन मुलांसह कसेबसे स्वत:चे पोट भरत होत्या. त्यांच्या पायांना एवढ्या गंभीर जखमा आहेत की त्या उभेही राहू शकत नाही. आयुष्यभर त्या आता धावपळ करू शकणार नाही, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे नातेवाईक सांगतात.
विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी जखमीचे बयाण घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी २७९, ३३७ भादंवि, तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ या जुजबी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून जखमींचे नातेवाईक पोलिसांकडे आरोपींवर काय कारवाई झाली. या संबंधाने विचारणा करीत आहेत. मात्र, घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या कारचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याचे सांगून गिट्टीखदान पोलिस हात झटकत आहेत. विशेष म्हणजे, स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हीचे जाळे शहरात सर्वत्र विणले आहे. दुसरे म्हणजे, ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या मार्गावर आजूबाजूला अनेक घरांवर, एटीएम, बँक, शाळा आणि दुकानांवर सीसीटीव्ही आहेत. असे असताना २० दिवस होऊनही गिट्टीखदान पोलिसांना एकाही सीसीटीव्हीच्या कॅमेरात आरोपी कारचालकाचा नंबर मिळू नये, ही बाब स्वतंत्र तपासाचा विषय ठरली आहे.
तीन आठवड्यांत चार तपास अधिकारी, प्रकारच संशयास्पद !
या अपघाताची प्राथमिक चाैकशी करून पीएसआय गेठे यांनी गुन्हा दाखल केला. नंतर त्याची चाैकशी बोरकर नामक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यात आल्याचे जखमींच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. आता राजेश पुरी या प्रकरणात चाैकशी करीत आहेत. या संबंधाने लोकमतने गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद काळेकर यांच्याशी संपर्क केला असता, प्रकरणाची चाैकशी सुरू आहे, असे ते म्हणाले.
पोलिस आयुक्तांकडे गाऱ्हाणे
सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघाताचे प्रकरण देशभर गाजत आहे. या प्रकरणातून असंवेदनशीलतेचे अनेक संतापजनक पैलू रोज उघड होत आहेत. अशाच प्रकारे रितिका मालू नामक धनिक महिलेकडून नागपुरातील दोन तरुणांचे बळी घेतल्याचे प्रकरणही पोलिसांच्या प्रारंभीच्या संशयास्पद भूमिकेमुळे टीकेचा विषय ठरले आहे. आता गिट्टीखदान पोलिसांचा तीन आठवड्यांपासून सुरू असलेला संशयास्पद तपास चर्चेला आला आहे. या पार्श्वभूमीवर, वेदनांमुळे रोज प्रचंड आक्रोश करणाऱ्या जखमी ममता यांचे दीर दीपक आदमने यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याय मागितला आहे.