नायलाॅन मांजा विक्रेत्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:00+5:302021-01-14T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/हिंगणा : नागपूर शहरात नायलाॅन मांजामुळे दाेघांचा हकनाक बळी गेल्यानंतर पाेलीस यंत्रणेने या मांजा विक्रेत्यांवर कारवाई ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी/हिंगणा : नागपूर शहरात नायलाॅन मांजामुळे दाेघांचा हकनाक बळी गेल्यानंतर पाेलीस यंत्रणेने या मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पाेलिसांनी नायलाॅन मांजा विक्रेत्यांच्या घरी तसेच दुकानावर धाड टाकून कामठी येथे १३ हजार रुपये किमतीचा नायलाॅन मांजा जप्त केला.
कामठी शहरातील इस्माईलपुरा भागातील एका घरी नायलाॅन मांजाची विक्री केली जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांनी मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आराेपीच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता, एका पांढऱ्या रंगाच्या पाेत्यात २६ नग प्लास्टिक चक्रीवर नायलाॅन मांजा गुंडाळलेला आढळला. त्यावर माेनाेकाईट कंपनीचे गुलशन क्वीन लागलेले हाेते. हा नायलाॅन मांजा विक्री करण्यास बंदी असताना आराेपी ते विक्रीसाठी स्वत:कडे बाळगून हाेता. १३ हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करीत पाेलिसांनी आराेपी माे. अकरम माे. इब्राहिम शेख (५३, रा. इस्माईलपुरा, कामठी) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३३६, १८८ सहकलम पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५, १५ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई वरिष्ठ पाेलीस निरीक्षक संजय मेंढे, दुय्यम पाेलीस निरीक्षक आर. आर. पाल, सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनाेजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांच्या पथकाने केली.
हिंगणा व एमआयडीसी पाेलिसांनी बुधवारी नायलाॅन मांजा विक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई करीत त्यांच्याकडून नायलाॅन मांजाच्या चक्री जप्त केल्या. नायलाॅन मांजामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मृत्यू हाेण्याच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे मांजा लुटण्यासाठी लहान मुले वर्दळीच्या रस्त्याने सुसाट धावतात. यामुळे अपघातही घडतात. या घटनांवर आळा घालण्यासाठी हिंगणा व एमआयडीसी पाेलिसांनी नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
...
घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कारवाई
पतंग उडविण्याच्या नादात शाैकिनांकडून नायलाॅन मांजाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या नायलाॅन मांजामुळे कित्येकांचे हकनाक बळी गेले. शिवाय, पशु-पक्ष्यांचाही मृत्यू हाेत आहे. असे असले तरी नायलाॅन मांजाची विक्री सर्रास सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी तसेच मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाेलिसांनी ही कारवाई माेहीम सुरू केली आहे.