सत्यम गृहनिर्माण बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:40+5:302021-03-23T04:07:40+5:30
नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी केल्यामुळे सत्यम गृहनिर्माण बिल्डर्स ...
नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी केल्यामुळे सत्यम गृहनिर्माण बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला जोरदार दणका बसला. डॉ. तुषार व्यास असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते सक्करदरा येथील रहिवासी आहेत.
व्यास यांना त्यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्यावे. संबंधित भूखंडाचे मोजमाप व सीमांकन करावे आणि व्यास यांना भूखंडाचा कायदेशीर ताबा द्यावा. कायदेशीर अडचणीमुळे असे करणे अशक्य असल्यास व्यास यांना संबंधित भूखंडाची वर्तमान बाजारभावानुसार किंमत अदा करावी, असे आदेश आयोगाने सत्यम डेव्हलपर्सला दिले. तसेच, व्यास यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम सत्यम डेव्हलपर्सनेच द्यायची आहे.
आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी सदर प्रकरणावर निर्णय दिला. प्रकरणातील माहितीनुसार, व्यास यांनी सत्यम डेव्हलपर्सच्या मौजा बेलतरोडी येथील ले-आऊटमधील एक भूखंड १ लाख २० हजार रुपयात खरेदी करण्यासाठी करार केला आहे. तसेच, ७ जानेवारी २०१२ ते २३ एप्रिल २०१२ पर्यंत भूखंडाची संपूर्ण रक्कम सत्यम डेव्हलपरला अदा केली आहे. दरम्यान, व्यास यांनी संबंधित भूखंडावर घर बांधण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली असता त्यांना विक्रीपत्राची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी सत्यम डेव्हलपरला भूखंडाचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, त्यांना विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता सत्यम डेव्हलपरला दणका दिला.