हायटेक पोलिसांच्या १०० नंबरवरून मिळाली नाही मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:36 AM2018-02-06T00:36:53+5:302018-02-06T00:39:36+5:30
शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.
धरमपेठ परिसरात गर्ल्स होस्टेल आहे. दिवसभर वाहनांची ये-जा असल्याने होस्टेलमधील मुली त्यांची वाहने होस्टेलजवळील फुटपाथवर पार्क करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता संशयास्पद युवक होस्टेलजवळ आले. ते नशेत होते. त्यातील एका युवकाने दुचाकीचे लॉक तोडले आणि तो बाईक नेण्याचा प्रयत्न करू लागला. होस्टेलच्या मुलींच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याला अडवले. तेव्हा तो विद्यार्थिनींसोबत धक्काबुक्की करू लागला. इतर मुली घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी लगेच पोलिसांच्या आपत्कालीन १०० नंबरवर फोन केला. तेव्हा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अर्धा तास त्यांनी प्रयत्न केला. चौकीदारही बाहेर गेला असल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दरम्यान सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान बरीच आरडाओरड झाल्याने नागरिक जमा होत होते. हे पाहून आरोपी युवक पळून गेले. यानंतर सीताबर्डीचे तीन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा एका पोलिसाने मुलींनाच समज दिली. ‘हे गर्ल्स होस्टेल आहे, अशा घटना तर होऊ शकतात, तुम्हीही समजू शकता, असा सल्ला देऊ लागला. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला. चौकीदाराचीही तक्रार केली. त्यानंतर उद्या येतो असे सांगून निघून गेले. दोन दिवस झाले पोलिसांनी होस्टेलमध्ये आलेले ते युवक कोण होते, याची साधी चौकशीही केली नाही.
पोलिसांच्या सामाजिक शाखेने मोबाईल अॅप सुरू केले होते. गर्ल्स होस्टेलच्या संचालक आणि त्यात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. तसेच त्या दूर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु या घटनेनंतर पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.