नागपुरात एचआयव्हीबाधितांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:40 PM2019-11-29T23:40:27+5:302019-11-29T23:41:04+5:30
‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एचआयव्हीबाधितांनी नियमीत औषधी घेतल्यास विषाणूची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. ‘एआरटी ड्रग्स’ योग्य पद्धतीने व नियमित घेणे हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु ‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एचआयव्ही पॉझीटिव्ह म्हणून जगताना बहुतेकदा अज्ञान आणि गैरसमजापोटी औषधांबाबत रु ग्णांमध्ये जागरु कता नसते. नि:शुल्क मिळणारे औषध अचानक बाहेरून विकत घेण्यास त्यांची मनस्थिती नसते. काहींची आर्थिक परिस्थीती नसते. फार कमी जण पदरमोड करून बाहेरून औषध विकत घेतात. याचा परिणाम, आजार वाढण्यावर होतो. मेडिकल, मेयोसह सर्वच ‘एआरटी सेंटर’वर गेल्या काही महिन्यांपासून एचआयव्हीबाधितांसाठी फारच आवश्यक असलेले ‘नेव्हीरॅपीन-२००’ व ‘झेएलई’ यासह इतरही औषधांचा तुटवडा पडला आहे. सुत्रानूसार काही दिवसांपूर्वी औषधांचा पुरवठा करणाऱ्या ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) दोन महिने औषधांचा पुरवठा सुरळीत होणार नाही याची माहिती देवून स्थानिकस्तरावर औषधांची खरेदी करण्यासाठी निधी दिला. परंतु मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील प्रमुखांची सेवानिवृत झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेल्या नव्या प्रमुखांच्या नावाचे बँकेत खाते उघडण्यापासून इतरही प्रक्रियांना होत असलेल्या उशीरांमुळे औषधे विकत घेण्यास वेळ लागत आहे.
तुवड्यामुळे बाधितांना सात दिवसांच्या औषधी
प्राप्त माहितीनुसार, मेडिकलच्या ‘एआरटी’ केंद्रावर महिन्याकाठी सुमारे आठ हजारावर एचआयव्हीबाधित औषधींसाठी येतात. महिन्याकाठी साधारण २६ हजार औषधींची गरज पडते. परंतु आठ-दहा हजार औषधींचा पुरवठा होतो परिणामी, बाधितांना जिथे महिन्याचे औषधी दिले जायचे तिथे आठवड्याचे औषधे दिले जात आहे. यामुळे अनेकांवर मेडिकलच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.
विना औषध मृत्यूचा धोका
दीड-दोन महिन्यांपासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने विदर्भातील एआरटी केंद्रांवर उपचार घेणारे सुमारे पन्नास हजार एचआयव्हीबाधित प्रभावित झाले आहेत. यातच आर्थिक मागासलेपणामुळे अनेकांना केंद्रांवर औषधे घेण्यास येणे-जाणे परवडत नसल्याने औषधे घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
औषधांसाठी वर्षभरापासून चकरा
मेडिकलच्या एआरटी केंद्रावर ‘झेडएलई’ हे औषध डिसेंबर २०१८ पासून नाही. एचआयव्हीबाधितांना महिन्याला अडीच हजार रुपये खर्च करून बाहेरून ही औषधे घ्यावी लागत आहे. प्रत्येकाला मात्र हे परडवणारे नाही. यामुळे शासनाने एचआयव्ही बाधितांच्या औषधोपचाराकडे विशेष लक्ष देऊन औषधांचा तुटवडा जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
विपीन सिरस्कर
सामाजिक कार्यकर्ता