नागपुरात पोलीस लावणार गुंडांचे होर्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:02 AM2019-07-03T00:02:00+5:302019-07-03T00:05:07+5:30

नेत्यांसोबत स्वत:चे फोटो काढून त्याचे होर्डिंग बनवायचे आणि स्वत:चा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करायचा, असा अनेक गुन्हेगारांचा फंडा आहे. मात्र, हाच फंडा वापरून पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांना तोंड लपविण्यासाठी बाध्य करण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे आता जागोजागी गुन्हेगारांचे होर्डिंग्ज् बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, हे होर्डिंग्ज् खुद्द पोलीसच चौकाचौकात लावणार आहेत.

Hoardings of goons will display by Nagpur police | नागपुरात पोलीस लावणार गुंडांचे होर्डिंग

नागपुरात पोलीस लावणार गुंडांचे होर्डिंग

Next
ठळक मुद्देतडीपार गुंडांचा उपद्रव रोखण्यासाठी अनोखी योजना : आपण यांना पाहिले का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेत्यांसोबत स्वत:चे फोटो काढून त्याचे होर्डिंग बनवायचे आणि स्वत:चा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करायचा, असा अनेक गुन्हेगारांचा फंडा आहे. मात्र, हाच फंडा वापरून पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांना तोंड लपविण्यासाठी बाध्य करण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे आता जागोजागी गुन्हेगारांचे होर्डिंग्ज् बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, हे होर्डिंग्ज् खुद्द पोलीसच चौकाचौकात लावणार आहेत.
कुख्यात गुंडांचा उपद्रव रोखण्यासाठी पोलीस त्यांना शहरातून हुसकावून लावतात. कुख्यात गुंडांचा गुन्हेगारी अहवाल तयार करून त्यांना सहा महिन्यासाठी, एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी तडीपार केले जाते. तडीपार गुंडाला पोलीस त्याच्या बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांकडे नेऊन सोडतात. मात्र, इकडे पोलीस परततात आणि त्यांच्याच मागे तडीपार गुंडही येतो. तो काही दिवस शहरातील दुसऱ्या भागात दडून बसतो. काही जण लॉज, हॉटेलमध्ये मुक्काम ठोकतात तर काही गुंड आपल्या साथीदारांच्या घरी राहतात. तेथून ते आपले अवैध धंदे चालवितात. खंडणी वसूल करतात आणि गुन्हेही करतात. अर्थात तडीपार करण्यात आलेले गुंड केवळ पोलिसांच्या रेकॉर्डवरच बाहेरगावी असतात. प्रत्यक्षात ते नागपुरातच राहतात अन् गुन्हेगारीतही सक्रिय असतात. त्यांना नागपुरातून तडीपार केल्याची कल्पना केवळ पोलीस आणि गुंडांच्या नातेवाईकांसह आजूबाजूच्या मोजक्या लोकांना असते. त्यांची परिसरात दहशत असल्यामुळे अनेक तडीपार गुंडांबाबत माहिती असूनही सर्वसामान्य नागरिक पोलिसांना माहिती देण्याचा धोका पत्करत नाहीत. त्यामुळे हे तडीपार गुंड हाणामारी, खंडणी वसुली, अवैध धंदे करण्यासोबतच प्रतिस्पर्धी गुंडांवर प्राणघातक हल्ले करणे, त्याची हत्या करण्यासाठीही मागे-पुढे बघत नाहीत. गेल्या चार महिन्यात अनेक तडीपार गुंडांच्या संबंधाने हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे तडीपार गुंड पुन्हा शहरात (त्यांची दहशत असलेल्या भागात) मोकाट फिरणार नाही, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी जालीम उपाययोजना शोधली आहे. नागपुरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचे होर्डिंग तयार करायचे आणि ज्या भागात त्यांची दहशत आहे, त्या भागात ते लावायचे. या होर्डिंगवर त्या गुंडांचे छायाचित्र, नाव आणि पत्ता राहणार आहे.
या गुंडांना नागपुरातून हद्दपार करण्यात आले असून, ते या भागात अथवा शहरात कुठल्याही ठिकाणी दिसल्यास जवळच्या पोलिसांना किंवा नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन या होर्डिंग्ज्वर पोलिसांनी केले आहे.
मानकापुरातून सुरुवात
तडीपार गुंडांचा उपद्रव रोखण्यासाठी पोलिसांनी आज या अनोख्या योजनेची सुरुवात मानकापूर चौकातून केली आहे. विक्की जीवन समुंद्रे (वय ३५, रा. जय हिंदनगर, मानकापूर), अब्दुल शहजाद अब्दुल सत्तार (वय ३६, रा. ताजनगर, मानकापूर) आणि अब्दुल सोहेल ऊर्फ गोलू अब्दुल सत्तार (वय २८, रा. ताजनगर, मानकापूर) या तीन तडीपार गुंडांचे होर्डिंग आज सायंकाळी मानकापूर चौकात ठाणेदार वजीर शेख यांनी लावले.
५० गुंडांची यादी तयार
शहरातील ५० पेक्षा जास्त कुख्यात तसेच तडीपार गुंडांचे होर्डिंग्ज् नागपुरातील विविध भागात लवकरच लावले जाणार आहेत. त्यांनी उजळ माथ्याने शहरात फिरू नये तर तोंड लपवून शहराबाहेरच राहावे, असा या योजनेमागचा उद्देश असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी यासंबंधाने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Hoardings of goons will display by Nagpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.