विद्यार्थ्याची कॉलर पकडून कार्यालयात डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:47 AM2018-11-25T01:47:08+5:302018-11-25T01:49:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन कॉलर पकडून विद्यार्थ्याला कार्यालयात डांबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी शहरातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी जात आहेत. रेल्वेकडून त्यांना तिकिटात कन्सेशन देण्यात येते. कन्सेशन बुकवर त्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर माहितीची तपासणी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक कार्यालयातून करावी लागते. ही प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी भावेश चव्हाण आपल्या चार मित्रांसोबत नागपूर रेल्वेस्थानकावर आला. कन्सेशन बुकवरील काही नोंदीबाबत अधिकाऱ्याने शंका घेतल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्याने भावेशला कॉलर पकडून कार्यालयात डांबले, असा आरोप भावेश आणि त्याच्या मित्रांनी केला आहे. रेल्वेचे अधिकारी मात्र संबंधित अधिकाऱ्याची बाजू घेत आहेत.
विद्यार्थ्यानेच केली दुरुस्ती
नियमानुसार कन्सेशन बुकवर अधिकृत व्यक्तीने कोणत्याही चुकीची दुरुस्ती अधिकाऱ्यासमक्ष करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विद्यार्थ्याने स्वत:च दुरुस्ती केली. या बाबीची माहिती महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला देईपर्यंत विद्यार्थ्याला थांबविणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला डांबल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार उशिरा रेल्वे सुरक्षा दलाकडे करण्यात आली.