केवळ हात पकडल्याने विनयभंग नाही, हायकोर्टाचा निर्णय; आरोपीचे फिर्यादी मुलीवर होते एकतर्फी प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 08:46 AM2023-12-11T08:46:04+5:302023-12-11T08:46:28+5:30
लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.
नागपूर : लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.
वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथील आरोपी आर्यन ऊर्फ रवींद्र काशीनाथ तोडकर (२९) याची एका मुलीसोबत मैत्री होती. ते मोबाइलवरून रोज एकमेकांसोबत बोलत होते. आर्यनचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. एकदा त्याने मुलीला स्वत:च्या भावना सांगितल्या. परंतु, मुलीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास त्या मुलीला रोडवर अडवले.
मुलाने हात पकडून मुलीला जवळ ओढले व तू माझ्यासोबत का बोलत नाही, तू मला आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हटले, परंतु त्याने मुलीच्या शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला नाही. लैंगिक भावनेसंदर्भात एक शब्दही उच्चारला नाही. उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे विचारात घेता आरोपीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आक्षेपार्ह आहे. पण त्याला विनयभंग व इतर संबंधित गुन्ह्याअंतर्गत दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असे सांगितले.
आरोपीची निर्दोष सुटका
२५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर अपीलमध्ये ५ ऑगस्ट २०२३ रोजी सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता.
उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांवरून कोणतेही गुन्हे सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करून त्याला निर्दोष सोडले.