७९ व्या वर्षी हृदयाच्या धमनीला छिद्र; दुर्मीळ रोगावर शस्त्रक्रियाविरहित उपचाराने रुग्णाला जीवनदान
By सुमेध वाघमार | Published: September 12, 2022 03:40 PM2022-09-12T15:40:19+5:302022-09-12T16:46:03+5:30
डॉ. हरकुट यांच्या मते, या वयात हा विकार अत्यंत दुर्मीळ आहे
नागपूर : हृदयातील पडद्याला छिद्र हे जन्मजात असते; परंतु वयाचा ७९ वर्षी हृदयाच्या मुख्य धमनीला छिद्र पडल्याचे आणि ते हृदयाच्या उजव्या कप्प्यात उघडत असल्याचे आढळून येणे हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’हाच पर्याय असतो; परंतु रुग्णाचे वय पाहता त्यांच्यावर शस्त्रक्रियाविरहित यशस्वी उपचार करून जीवनदान देण्यात आले.
मध्य प्रदेशातील ७९ वर्षीय या रुग्णाच्या दोन्ही पायाला सूज आल्याने त्यांच्या नातेवाइकांनी नागपुरातील ‘स्वास्थम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. हा शिरासंबंधीची (वेन्स) समस्या असावी म्हणून व्हॅस्कुलर सर्जन डॉ. रोहित गुप्ता यांनी रुग्णाला तपासले; परंतु रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे डॉ. गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णाला इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. पंकज हरकुट यांच्याकडे पाठविले. डॉ. हरकुट यांनी रुग्णाची ‘इकोकार्डियोग्राफी’ केली. यात त्यांना हृदयाच्या मुख्य धमनीला छिद्र असल्याचे आणि ते हृदयाच्या उजव्या कप्प्यात उघडून तिथे रक्त जात असल्याचे आढळून आले. डॉ. हरकुट यांच्या मते, या वयात हा विकार अत्यंत दुर्मीळ आहे.
कॅथेटरने छिद्र बंद करण्याचा घेतला निर्णय
हृदयाच्या मुख्य धमनीचे छिद्र बंद करण्यासाठी ‘ओपन हार्ट सर्जरी’ केली जाते; परंतु रुग्णाचे वय व त्यांना असलेले इतरही आजार लक्षात घेऊन ही शस्त्रक्रिया धोक्याची ठरण्याची शक्यता अधिक होती. यामुळे डॉ. हरकुट व डॉ. मनीष चोखंदरे आणि इतर टीम सदस्यांनी रुग्णाचा या दुर्मीळ विकाराचा बारकाईने अभ्यास केला आणि कॅथेटरच्या मदतीने छिद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.
छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाची मदत
डॉ. हरकुट म्हणाले, धमनीचे छिद्र बंद करण्यासाठी छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाची मदत घेण्यात आली. यासाठी ‘कॅथेटर’ नावाच्या रचनेसारख्या नळीद्वारे हे उपकरणे हृदयाच्या छिद्रापर्यंत नेण्यात आले. ‘वायर’च्या साहाय्याने हृदयामध्ये एक ‘लूप’ तयार केला. ‘कॅथेटर’द्वारे या ‘वायर’वर हे उपकरण बसविले. ‘कॅथेटर’ काढून टाकण्यात आल्यानंतर उपकरणाने छत्रीचा आकार घेतला व छिद्र बंद झाले. यामुळे हृदय पुन्हा सामान्यपणे काम करायला लागले. ही प्रक्रिया भूल न देता कॅथलॅबमध्ये करण्यात आली.
जगातील हे पहिले प्रकरण
वयाचा ७९ व्या वर्षी हृदयाच्या मुख्य धमनीला छिद्र पडून ते हृदयाच्या उजव्या कप्प्यात उघडत असल्याचे आणि विनाशस्त्रक्रिया त्यांच्यावर यशस्वी उपचार केल्याचे जगातील हे पहिले प्रकरण असावे. अशा प्रकारच्या दुर्मीळ आजारावर उपचार करणे आव्हानात्मक असते. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अनुभवी टीमने आणि डॉ. गौरव छाजेड, डॉ. सोहल पराते यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
-डॉ. पंकज हरकुट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट