नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 09:39 PM2020-03-09T21:39:03+5:302020-03-09T21:44:30+5:30
भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली. यावेळी सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरपासून मुक्ती देण्याची प्रार्थना भाविक नागरिकांनी होलिका देवतेकडे केली.
शरद ऋतूमधील कोरडा गारवा सोडून वसंत ऋतूतील प्रसन्न वातावरणाकडे जाणारी ऋतूसंधी म्हणजे होळी हा सण होय. फाल्गुन पौर्णिमेला पेटविल्या जाणाऱ्या होळीला वाईट वृत्तीवर सत्याचा विजय अशा संदर्भानेदेखील बघितले जाते. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी सामूहिक होलिका दहन आणि पूजनाचे कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी आटोपले. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसले राजवाडा, बडकस चौक, संघ बिल्डिंग, रेशीमबाग, सक्करदरा, तिरंगा चौक, नंदनवन, उत्तर नागपुरात मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिर, इतवारी येथे सराफा बाजार, शांतिनगर, कळमना, श्रीकृष्णनगर, रमणा मारोती मंदिर अशा विविध ठिकाणी होलिका दहनाचे कार्यक्रम आटोपले. गृहिणींनी घरी केलेले गोडधोड याचे नैवेद्य होलिका देवतेला अर्पण करीत आयुष्य व आरोग्य वृद्धिंगत होण्याची याचना केली. मुलांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्यांकडून होलिका दहनाचा पौराणिक इतिहास जाणून घेतला. काही स्वयंसेवी संस्थांनी होलिकेस अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यास गोळा करून अनाथाश्रमात पोहोचविण्याचा नवा आणि उपकारक असा नवा पायंडा निर्माण केला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन झाले. काही ठिकाणी संगीताचे तर काही ठिकाणी विनोदी चुटकुल्यांचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी धुळवड साजरी होणार आहे. परंतु, होळी पेटताच ठिकठिकाणी एकमेकांवर रंग उधळण्यास सुरुवात झाली होती. काही ठिकाणी घरगुती जेवण आटोपल्यावर रात्रीच्या मैफिलीही रंगल्या. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने, शैलीने होलिका दहनाचा सोपस्कार सोमवारी रात्री पार पडला.