होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

By नरेश डोंगरे | Published: March 24, 2024 08:49 PM2024-03-24T20:49:40+5:302024-03-24T20:49:52+5:30

सोमवारी फेऱ्या कमी : विदर्भातील ट्रॅाफिक मंदावले, मध्य प्रदेशकडे चिक्कार गर्दी.

Holi came and the number of ST passengers increased | होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

नागपूर : होळीच्या दिवशी सर्वत्र प्रचंड उत्साह बघायला मिळत असताना विदर्भातील प्रवाशांनी एसटीकडे रविवारी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक बसगाड्या प्रवाशांअभावी रिकाम्या धावत होत्या. तर, दुसरीकडे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर एसटी आणि खासगी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली.

होळीचे पर्व कुठे दोन, कुठे तीन तर काही ठिकाणी सात दिवस साजरे केले जाते. होलिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थात होलिका दहन करण्यापूर्वीपासून रंग लावण्यास सुरूवात होते. लहान मोठे सर्वच उत्साहाने होळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी पुढे येत असल्याने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. या दिवशी व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारी मंडळी आपल्या गावाकडे जाण्यासाठी धावपळ करताना दिसतात. मात्र गाव सोडून या दिवशी दुसऱ्या गावाला जाण्याचे बहुतांश जण टाळतात. त्यामुळे की काय, आज नागपूरहून वर्धा, यवतमाळ, अमरावतीकडे जाणाऱ्या, येणाऱ्या अनेक बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे दिसून येत होते. दुपारपर्यंत किमान १५ ते २० प्रवासी बसमध्ये दिसत होते. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर विदर्भातील विविध मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच घसरली होती. बहुतांश बसमध्ये केवळ ५ ते १० प्रवासीच जात, येत असल्याचे दिसत होते.
एसटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिवनी, बालाघाटकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर स्थानकावरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
 
सोमवारी फेऱ्या कमी करणार
सोमवारी रंगोत्सव अर्थात धुळवड आहे. या दिवशी बहुतांश मंडळी घर-मित्रपरिवारात राहून मनसोक्त रंग उधळण्याच्या मनस्थितीत असतात. त्याचा परिणाम प्रवासी संख्या घटण्यावर होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता एसटी महामंडळाने यावेळी धुळवडीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध मार्गावर बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सोडली जाते, त्या मार्गावर सोमवारी सकाळपासून दर ३० मिनटांनी बस सोडण्यात येईल. दुपारी आणि सायंकाळी ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसेल, त्या मार्गावरच बस चालविण्यात येणार आहे.
 

Web Title: Holi came and the number of ST passengers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर