नागपुरात सर्वत्र होळी दहन ... ‘कॅट’तर्फे चिनी वस्तूंची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:18 PM2019-03-20T23:18:07+5:302019-03-20T23:19:04+5:30
चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली. व्यापारी देशाचे चौकीदार असून चिनी वस्तूंची विक्री देशात होऊ देणार नाही, असा इशारा ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी येथे दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने दहशतवादी मसूद अजहरची बाजू घेतली. शिवाय पाकिस्तानला मदत करण्याच्या चीनच्या भूमिकेमुळे देशवासीयांचा चीनप्रती असलेला संताप व्यक्त करण्यासाठी देशातील सात कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॅटच्या आव्हानार्थ देशातील विविध राज्यांमध्ये व्यापारी संघटनांनी १५०० पेक्षा जास्त ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करून वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प केला. भारतात पाकिस्तानद्वारे चालविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी चीनने पाकिस्तानची मदत बंद करावी, अन्यथा चीनसाठी वैश्विक बाजार असलेल्या भारतात चिनी वस्तूंची विक्री बंद करू, अशा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि चिनी वस्तूंवर ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी करताना व्यापाऱ्यांनी एकजूटतेचे आवाहन केले.
एनव्हीसीसीमध्ये दहशतवाद व ऑनलाईन ट्रेडिंगचे दहन
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बुधवारी चेंबरच्या सिव्हिल लाईन्स येथील प्रांगणात दहशतवाद, चिनी वस्तू आणि ऑनलाईन ट्रेडिंगचे दहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी हर्षोल्लासात सर्व धर्म, जात, पक्ष आणि वर्गांनी मिळून एक दुसऱ्याला गुलाल लावून होळीचा आनंद लुटला. चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी व्यापाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. व्यापाऱ्यांनी शासनासोबत उभे राहावे. देशातील सर्व नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि ऑनलाईन व्यापाराची त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. याप्रसंगी चेंबरचे माजी अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, गोविंदलाल सारडा, राधेश्याम सारडा, हेमंत खुंगर, जगदीश बंग, दीपेन अग्रवाल, मयूर पंचमतिया, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, सचिव संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, राजू माखिजा, सूर्यकांत अग्रवाल, गजानंद गुप्ता, महेशकुमार कुकडेजा, रमेश उमाटे, प्रताप मोटवानी, रमण पैगवार, संतोष काबरा, राजेश ओहरी, सौरभ अग्रवाल, आलोक दास, संजयराज मोढ सराफ, मनीष जेजानी, राजेश मुनियार, शंकर सुगंध, नटवर पटेल, अभिषेक झा उपस्थित होते.
या शिवाय शहरभर होळीचे पूजन करून मोठ्या जल्लोषात होळीचे दहन करण्यात आले.