नागपुरात पोलिसांच्या उत्कृष्ट बंदोबस्तामुळे होळी धुळवड शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:04 PM2018-03-03T23:04:05+5:302018-03-03T23:04:19+5:30
होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पोलिसांनी उपराजधानीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन केल्याने दोन्ही दिवस नागपूरकर जनतेने हे सण उत्साहात साजरे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पोलिसांनी उपराजधानीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन केल्याने दोन्ही दिवस नागपूरकर जनतेने हे सण उत्साहात साजरे केले.
होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने मद्यपान करून अनेक जण रस्त्याने गोंधळ घालत फिरतात. आरडाओरड करतात अन् बेदरकारपणे वाहने चालवून अपघात घडवितात. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात. महिला-मुलींची छेड काढण्याचेही प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार लक्षात घेत होळीच्या दिवशी सायंकाळपासूनच पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. रस्त्यारस्त्यावर बॅरिकेटस् लावून अनेकांची तपासणी केली. रस्त्यावरची गस्तही वाढवली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला. दारू च्या नशेत धिंगाणा घालू पाहणारे तळीराम आणि हुल्लडबाजांवर विशेष नजर ठेवण्यात आली. बंदोबस्तासाठी पाच पोलीस उपायुक्त, १० सहायक पोलीस आयुक्त, पोलीस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत १८०० पोलीस आणि होमगार्डसह एकूण २६०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाचे जवानही सज्ज होते.
होळी-धुळवडीच्या निमित्ताने दारू, गांजा तसेच अन्य अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या धंद्यात गुंतलेले मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. पोलिसांनी नाकेबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली. त्यामुळे हुल्लडबाजांना आवरण्यात पोलिसांना यश आले. संशय येताच वाहनचालक आणि वाहनांना थांबवून पोलीस त्यांच्या तोंडाचा वास घेत होते. वाहनांची तपासणीही करीत होते. परिणामी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे नागपूरकरांनी होळी-धुळवडीचा आनंद घेतला.
वाहतूक शाखेची कामगिरी
दारूच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याकरीता वाहतूक शाखेने शहरात एकूण ३२ बॅरिकेटस् पॉर्इंट लावले होते. त्याअंतर्गत ८३९ मद्यपि चालकांविरुद्ध तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४८ चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. त्यात विना हेल्मेटचे १९०, ट्रिपल सीट ७७, सिग्नल तोडणारे ४५, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणाऱ्या ७१, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या १२ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. बंदोबस्ताच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शहरात मोठे अपघात घडले नाही.
सर्व श्रेय नागरिकांना
पोलीस नेहमीच चांगले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जोपर्यंत नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत पोलिसांचे प्रयत्न यशस्वी होत नाही. यावेळी पोलिसांच्या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे होळी धुळवडीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला.
डॉ. के. व्यंकटेशम
पोलीस आयुक्त, नागपूर