नागपुरात भाजपाकडून वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:18 PM2020-11-23T17:18:20+5:302020-11-23T17:19:38+5:30
Nagpur News BJP महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सकाळी शहरातील विविध भागात हे आंदोलन झाले.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १० नंबर पुलिया जवळ वीजबिले जाळण्यात आली. राज्य शासनाने जनतेचा विश्वासघात केला असून वीजबिलमाफी त्वरित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांनी दिला. यावेळी भाजपा उत्तर नागपुर अध्यक्ष संजय चौधरी, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्यासह राहुल खंगार, सचिन करारे, कमलेश पांडे, सचिन सावरकर, अमेय विश्वरुप, अमित पांडे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शहरभरात सुमारे दीडशे ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
कुणाचीही वीज कापू देणार नाही
भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात तुळशीबाग येथे वीज बिले जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. अन्यायकारक बिलं वापस घ्यावीच लागतील. १०० युनिट मोफत देण्याची घोषणा राबवावी लागतीलच. नागरिकांनी वाढीव बिल भरु नये. चुकीचे बिल देऊन जर वीज तोडणी कापण्याचा प्रयत्न केला तर भाजप त्याचा विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.