विदर्भवाद्यांच्या आंदोलनात वीजबिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:09 AM2021-08-15T04:09:39+5:302021-08-15T04:09:39+5:30
नागपूर : विदर्भ राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी शेकडो वीजबिलांची जाहीर ...
नागपूर : विदर्भ राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी शेकडो वीजबिलांची जाहीर होळी करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. कोरोनाकाळातील वीजबिलमाफी न झाल्याच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले.
विदर्भ राज्य मागणीसह इंधन दरवाढ आणि वीजबिलमाफी या आंदोलनातील दोन प्रमुख मागण्या होत्या. त्या केंद्रस्थानी ठेवूून राज्य महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे यांच्या पुढाकारात हे आंदोलन झाले. ‘दिल्लीत वीज स्वस्त, महाराष्ट्रात जनता दरवाढीने त्रस्त’ असा नारा देत घोषणाबाजी करून महिला कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात प्रामुख्याने सुनीता येरणे, रेखा निमजे, उषा लांबट, ज्योती खांडेकर, वीणा भोयर, जया चातुरकर, शोभा येवले, संगीता अंबारे, सुहासिनी खडसे, कुंदा राऊत, प्रभा साहू, कोमल दुरूगकर, माया बोरकर आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
आज ॲड. वामनराव चटप आणि राम नेवले यांच्यासह मुकेश मासुरकर, सुखदेव पातरे, ज्योती खांडेकर, ॲड. अजय चमेडिया, अरुण जोग, गोविंदराव चिंतेवार, अशोक हांडे, राजेंद्र आगरकर, अजय शाहू, प्यारूभाई आदींची भाषणे झाली.
...
...तर महिला चोप देतील - रंजना मामर्डे
कोरोना ही देशावर आलेली आपत्ती होती. सरकारी बंधनांमुळे या काळात उद्योग, व्यापार, शेती, रोजगार नसल्यामुळे जनतेची क्रयशक्ती संपली. त्यातच वीजबिल वाढवून राज्य सरकारने जनतेची लुटमार चालवली आहे. वीजकनेक्शन कापणे बंद करावे, बिल माफ करावे, अन्यथा वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विदर्भातील महिला चोप देतील, असा इशारा रंजना मामर्डे यांनी दिला.
...
आज अन्नत्याग आंदोलन
आंदोलनाच्या सातव्या दिवशी १५ ऑगस्टला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सकाळी १० वाजेपासून उपोषणाला प्रारंभ होईल. दुपारी ३ वाजता कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल.
...