आला होळीचा सण लई भारी! धुळवड खेळा..इकोफ्रेंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:44 PM2019-03-20T22:44:29+5:302019-03-20T22:45:32+5:30
धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह शहरातील व्यापाऱ्यांनी या उत्साहात भर टाकली. अनेकांनी कोरडा रंग खेळून शांततेत धूळवड साजरी करण्याचा संदेश दिला. तर इकोफ्रेंडली होळीवर भर द्यावा, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह शहरातील व्यापाऱ्यांनी या उत्साहात भर टाकली. अनेकांनी कोरडा रंग खेळून शांततेत धूळवड साजरी करण्याचा संदेश दिला. तर इकोफ्रेंडली होळीवर भर द्यावा, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले.
एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. लोकांच्या मनात लपलेले मनोविकार होळीच्या दुसऱ्या दिवशी बाहेर काढण्याची संधी असते. होळीचा जल्लोष नागपुरात सुरू झाला असून, लहानांपासून वयस्कांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होळीचा जल्लोष द्विगुणित करण्यासाठी अनेक कुटुंबीयांनी बुधवारी एकत्रित येऊन ढोलताशाच्या गजरात होलिकेचे दहन केले. गुरुवारी रंगपंचमीचा जल्लोष राहणार असून, रंगांची मनसोक्त उधळण करणार आहेत. अनेकांचा वैयक्तिक तर बहुतांश जणांचा कुटुंबीयांसह रंगपंचमी साजरी करण्याचा बेत आहे.
होळीच्या विविधरंगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. दोन दिवसात पाच कोटींची उलाढाल होत असल्याचा व्यापाऱ्यांचा कयास आहे. देशप्रेम जोपासताना यावर्षी चिनी वस्तूंना नकार देत सर्वांचाच भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदीवर भर आहे. शिवाय सर्वांचीच नैसर्गिक आणि हर्बल रंगांना पसंती आहे. कलरफूल होळीसाठी विशेषत: युवती आणि महिलांमध्ये उत्साह संचारला आहे. रंगोत्सवाच्या तयारीसाठी तरुणाईने बुधवारीच रंगांची खरेदी केली. नागपुरातील सर्व बाजारपेठांमध्ये मुख्यत्वे इतवारी बाजारात बुधवारी रंग, पिचकाऱ्या, गुलाल, नैसर्गिक आणि हर्बल रंगाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. यंदा खरेदीदारांनी रासायनिक रंगांना नकार दिला असून, केवळ गुलालाची उधळण करण्यावर सर्वांचा भर आहे.