हॉलिडे बुकिंग आणि विदेशी मुद्रा खरेदीचा व्यवहार; दोघांना पावणेदोन कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 03:19 PM2021-02-06T15:19:38+5:302021-02-06T15:20:03+5:30

हॉलिडे बुकिंग, तसेच विदेशी मुद्रा खरेदी विक्रीच्या व्यवहारात बक्कळ लाभ मिळतो, अशी थाप मारून करोडोंचा गंडा घालण्यासाठी कुपरिचत असलेल्या रामदासपेठेतील गोयल कुुटुंबीयांविरुद्ध गुरुवारी तहसील आणि अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Holiday bookings and foreign exchange purchases; Both of them are worth Rs 52 crore | हॉलिडे बुकिंग आणि विदेशी मुद्रा खरेदीचा व्यवहार; दोघांना पावणेदोन कोटींचा गंडा

हॉलिडे बुकिंग आणि विदेशी मुद्रा खरेदीचा व्यवहार; दोघांना पावणेदोन कोटींचा गंडा

Next
ठळक मुद्देतहसील आणि अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हॉलिडे बुकिंग, तसेच विदेशी मुद्रा खरेदी विक्रीच्या व्यवहारात बक्कळ लाभ मिळतो, अशी थाप मारून ओळखींच्या व्यक्तींचा विश्वास संपादन करून, त्यांना लाखो, करोडोंचा गंडा घालण्यासाठी कुपरिचत असलेल्या रामदासपेठेतील गोयल कुुटुंबीयांविरुद्ध गुरुवारी तहसील आणि अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ईतवारीतील जैन मंदिराजवळ राहणारे आशिष जिनेंद्र जैन (वय ३८) यांनी तहसील ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, देवेंद्र गोविंद गोयल, रितेश गोविंद गोयल, गोविंद मुरारीलाल गोयल, निकिता देवेंद्र गोयल (सर्व रा.गोविंद भवन, रामदासपेठ), तसेच त्यांची साथीदार पायलसोमानी (रा.भक्तिसागर अपार्टमेंट) यांनी संगनमत करून १५ डिसेंबर, २०१४ला आशिष जैन यांना इंटरनॅशनल हॉटेल बुकिंग, फ्लाइट बुकिंग, टूर, तसेच विदेशी मुद्रा खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंचा लाभ मिळतो, असे सांगून या व्यवसायात रक्कम गुंतवण्यास सांगितले. आरोपी ओळखीचे आणि विश्वासातील असल्याने, जैन यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या कथनानुसार वेळोवेळी त्यांना २०१४ ते २०१८ या कालावधीत २ कोटी, २९ लाख, ९० हजार रुपये दिले. व्यवसायात चांगला नफा झाल्याचे सांगून आरोपींनी जैन यांना १ कोटी, १६ लाख, ८१ हजार ५०० रुपये परत दिले. उर्वरित १ कोटी, १३ लाख, ८ हजार ५०० रुपये लवकरच परत करतो, असे आरोपींनी सांगितले. मात्र, आजपर्यंत ते परत केले नाहीत. रक्कम व्यवसायात गुंतविल्याची थाप मारून आरोपींनी व्यवहार, तसेच नफ्याबाबतचे बँकेचे खोटे कागदपत्रही दाखविले. सात वर्षे होऊनही आरोपी नफा सोडा, मूळ रक्कमही परत करायला तयार नसल्याने जैन यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून शहानिशा केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणात तहसील पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

अंबाझरीत ५९ लाखांची फसवणूक

आरोपी देवेंद्र गोविंद गोयल, रितेश गोविंद गोयल, गोविंद मुरारीलाल गोयल, निकिता देवेंद्र गोयल, अनिता गोविंद गोयल आणि जितेंद्र मुरालीलाल गोयल (सर्व रा.गोविंद भवन, रामदासपेठ), तसेच त्यांची साथीदार पायलसोमानी (रा. भक्तिसागर अपार्टमेंट) यांनी अशाच प्रकारे वाडीच्या सुरेशचंद्र महेशचंद्र अग्रवाल (वय ७३) यांना ५९ लाखांचा गंडा घातला. अग्रवाल टायरचे वितरक असून, त्यांचे अंबाझरीतील रवीनगरात कार्यालय आहे. आरोपी गोयलसोबत त्यांचे घरोब्याचे संबंध होते.

जैन यांच्यासारखीच थाप अग्रवाल यांनाही आरोपींनी मारली आणि त्यांच्याकडून १० ऑगस्ट, २०१६ला ५९ लाख रुपये घेतले. त्यांनाही चार वर्षांत रक्कम परत केली नाही. त्यामुळे अग्रवाल यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून गुरुवारी देवेंद्र आणि रितेश या दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

ओळखीच्यांचाच करतात विश्वासघात

विशेष म्हणजे, आरोपींचा फसवणुकीचाच मुख्य व्यवसाय असून, त्यांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. ही ठगबाज मंडळी विश्वासातील मंडळींचाच विश्वासघात करतात, असेही अनेक प्रकरणांत दिसून आले आहे. यापूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध ३ कोटी, ९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आरोपी मोकाट सुटले आणि त्यांनी आपली बनवाबनवी सुरू ठेवली.

मध्य प्रदेशातही गुन्हा

उपरोक्त आरोपींपैकी एक जण क्रिकेट बुकी असून, तो या गोरखधंद्यात लाखो-करोडोंचे वारेन्यारे करतो. त्याच्याविरुद्ध जबलपूर, मध्य प्रदेशमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

----

Web Title: Holiday bookings and foreign exchange purchases; Both of them are worth Rs 52 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.