नागपुरात घरावर हल्ले, तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:03 AM2020-05-19T00:03:31+5:302020-05-19T00:05:14+5:30

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

Home attacks, vandalism in Nagpur | नागपुरात घरावर हल्ले, तोडफोड

नागपुरात घरावर हल्ले, तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
कळमनातील आदर्शनगर हनुमान मंदिराजवळ राहणारे महेश ओमराज घरडे (वय २५) यांच्यासोबत आरोपी चेतन ठाकूर गुलशन समुद्रेचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी घरडे आणि त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी रविवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी चेतन ठाकूर, गुलशन समुद्रे, आसिफ शेख, पीयूष पारधी, विलास विजेकर आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी महेश घरडेच्या घरावर घरावर हल्ला चढवला. त्यांच्या अंगणात ठेवलेल्या दोन वाहनांची तोडफोड केली. आरडाओरड करत घरडे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आरोपी आत शिरले. त्यांनी घरडेच्या घरातील शोकेस, खिडक्यांची तावदाने आणि सामानाची तोडफोड केली. एसीही फोडला. घरडे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच कळमनाचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे पोहोचले. त्यांनी घरडे यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची तक्रार नोंदवून उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. काही आरोपींना ताब्यात घेतले. अशीच दुसरी एक घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे २ च्या सुमारास घडली.
सुनील रामदास समुद्रे (वय ४८) हे ठक्करग्राम दुर्गामाता मंदिराजवळ राहतात. त्याच वस्तीत राहणारे आरोपी अमोल ऊर्फ चिडिया गावकर, चंचल गावकर, संदेश कनोजिया, अक्षय धामणे, लकी मलिक, राहुल गवतेल यांचा सुनील समुद्रेंसोबत जुना वाद आहे. त्या वादातून आरोपींनी समुद्रेंच्या घरावर सोमवारी पहाटे २ वाजता हल्ला चढवला. दगडफेक करून घराच्या सिमेंट पत्र्यांचे व कुंड्यांचे नुकसान केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. समुद्रे यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे

दोन्ही प्रकरणात अट्टल गुन्हेगार
विशेष म्हणजे, या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेल्यांमध्ये काही अट्टल गुन्हेगारही आहेत. दोन्ही प्रकरणातील आरोपी गुन्ह्याच्या वेळी दारूच्या नशेत टुन्न होते, असेही प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

Web Title: Home attacks, vandalism in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.