चोरांकडून पोलिसांना वाकुल्या; नागपुरात घरफोड्या सुरूच, २४ तासांत तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:25 PM2022-05-25T17:25:19+5:302022-05-25T18:24:56+5:30

उन्हाळ्यात घरमालक बाहेरगावी गेल्याचे पाहून घरफोडी करण्याचे सत्र सुरूच असून काही परिसरात यामुळे दहशत आहे.

Home burglary in Nagpur, three houses burglarized in 24 hours | चोरांकडून पोलिसांना वाकुल्या; नागपुरात घरफोड्या सुरूच, २४ तासांत तीन घरे फोडली

चोरांकडून पोलिसांना वाकुल्या; नागपुरात घरफोड्या सुरूच, २४ तासांत तीन घरे फोडली

Next
ठळक मुद्देकसे येणार नियंत्रण

नागपूर : शहर पोलिसांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी चोरांवर मात्र नियंत्रण येत नसल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात घरमालक बाहेरगावी गेल्याचे पाहून घरफोडी करण्याचे सत्र सुरूच असून काही परिसरात यामुळे दहशत आहे. मागील २४ तासांत शहरात दोन घरफोड्यांची नोंद झाली. यातील एक घरफोडी प्रतापनगर तर दुसरी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत नामदेव नगर येथील रहिवासी रुपेश नामेवार हे कुटुंबीयांसह चंद्रपूरला गेले होते. २४ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते घराला कुलूप लावून निघाले. परत आल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. अज्ञात चोराने बेडरुममधील कपाटातील ८५ हजार रोख व दागिने असा एकूण ३ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. नामेवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

दुसरी घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री लेआऊट येथे घडली. प्रकाश वेरुळकर हे आपल्या पत्नी व मुलीसह १५ मे रोजी पुण्याला गेले होते. तेथे काही आठवडे राहिल्यानंतर २४ मे रोजी ते नागपुरात परतले. घरी आल्यावर मुख्य दरवाज्याचा कोंडा तुटलेला होता व कुलूपदेखील तोडले होते. दोन्ही बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडले होते व कपाटे उघडी होती. एकूण सामानाची चाचपणी केली असता जवळपास ६७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. वेरुळकर यांनी तातडीने याची माहिती प्रतापनगर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्ह्याची नोंद केली आहे.

जरीपटक्यातदेखील घरफोडी

जरीपटका पोलीस ठाण्याच्या अंतर्गतदेखील बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या निवासस्थानी घरफोडी झाली. रिंगरोडजवळ राहणारे राहुल मितलानिये हे कुटुंबीयांसह २० मे ते २३ मे दरम्यान ते बाहेरगावी होते. या कालावधीत अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व रोख रक्कम तसेच दागिने असा २ लाख ७ हजारांचा माल लंपास केला. घरी परत आल्यावर राहुल यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Home burglary in Nagpur, three houses burglarized in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.