‘शरणस्थान’ रेडलाईट एरियामधील उपेक्षित चिमुकल्यांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:15 PM2020-01-01T12:15:06+5:302020-01-01T12:15:34+5:30

आम्ही मूळ केरळचे. एका कामानिमित्त नागपुरात आलो असताना ‘रेडलाईट एरिया’तील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारेच आले.

Home of Children in Redlight Area in Nagpur | ‘शरणस्थान’ रेडलाईट एरियामधील उपेक्षित चिमुकल्यांचा आधारवड

‘शरणस्थान’ रेडलाईट एरियामधील उपेक्षित चिमुकल्यांचा आधारवड

googlenewsNext

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘रेडलाईट’ भागातील संध्याकाळ संवेदनाहीन जखमांनी भरलेली असते. अशा परिस्थितीत पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा ‘तो’ प्रकार, त्या प्रकाराचा मुलांवर होणारा विपरीत परिणाम, त्याच चक्रात त्यांचे बंदिस्त होत असलेले भविष्य.. हे पाहून एका दाम्पत्याने ‘शरणस्थान’ या चॅरीटेबल संस्थेची स्थापना केली. गेल्या १२ वर्षांपासून हे दाम्पत्य येथील चिमुकल्यांना मित्रत्वाचा हात देत आहे. चंदा, बानो, आशा, सानिया, नितीन, प्रकाश अशांसाठी ही संस्था आधारवड ठरली आहे.
नागपूरच्या ‘रेडलाईट एरिया’मध्ये दोन हजाराहून अधिक महिला देहविक्र ीचा व्यवसाय करतात. दहा-बाय दहाच्या कोंदट खोलीत हा व्यवसाय चालतो. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या या मातांच्या माथ्यावरचे छप्परही तिच्या मालकीचे नाही. ज्या महिलांना पोटची मुले आहेत त्यांची अवस्था बिकटच. अशा मुलांना या जीवघेण्या चक्रातून बाहेर काढण्याचा पण २००२ मध्ये ईसो डॅनियल आणि लीला ईसो या दाम्पत्याने घेतला. त्यांनी अशा मुलांसोबत साधलेल्या मित्रबंधातून ‘शरणस्थान’ या चॅरीटेबल संस्थेची स्थापना केली. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे ११४ मुलेमुली आहेत. त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याचा आणि शिक्षणाचा खर्च हे दाम्पत्य उचलून त्यांच्यामध्ये जगण्याची आशा निर्माण करीत आहेत. येथील महिलांसाठी ही संस्था म्हणजे मोठी आधारवड ठरली आहे.

पत्नीचे डोळे डबडबले अन् सुरू झाला प्रवास
डॅनियल यांनी सांगितले, आम्ही मूळ केरळचे. एका कामानिमित्त नागपुरात आलो असताना ‘रेडलाईट एरिया’तील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारेच आले. पत्नी लीलाने त्या महिलांना बाहेर काढणे शक्य नसले तरी त्यांच्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली आणि शरणस्थानचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर, महिन्याभराची सुटी टाकली. त्यांच्याच वस्तीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्या खोल्यांमध्ये विशेषत: मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. सुरवातीला स्थानिकांचा रोष पत्कारावा लागला. भाषेचीही समस्या होती. तुटफूट हिंदीतून संवाद साधला जात होता. हळूहळू त्यांच्यामध्ये आमची मैत्री वाढत होती. तेथील महिलांना आमच्या कार्याची जाणीव व्हायला लागली. मुलींची संख्याही वाढू लागली. मुलांसोबतची मैत्री घट्ट झाली. आता मागे वळून पाहणे कठीण होते, म्हणून नोकरी सोडल्याचे डॅलियन सांगतात.

आमचे काम बघून महिलांनीच धरला आग्रह
येथील काही महिलांनी मुले आमच्याचकडे ठेवण्याचा आग्रह धरला. याच परिसरात बंद असलेल्या १४ खोल्यांची इमारत भाड्याने घेतली. २००३ पासून मुलांच्या निवासासोबतच त्यांच्या खाणे, पिणे आणि शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. यात आम्हाला आमचे जवळचे मित्र, काही देवस्थानच्या संस्था आणि चर्चेस मदत करीत आहेत. आज त्यांच्याच मदतीने ११४ मुलामुलींचा सांभाळ करतो आहे. या मुलांना शक्य तितके या वातावरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो, असेही डॅनियन म्हणाले. ४

Web Title: Home of Children in Redlight Area in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.