नागपूर शहरात दारूची ‘होम डिलिव्हरी’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:15 AM2020-05-16T00:15:02+5:302020-05-16T00:24:40+5:30
शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे.
शहरात केवळ ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ग्राहकांना ती घरपोच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही दारू दुकानदारालाच करायची आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश दारू दुकानदारांनी आज दारू दुकानांसमोर पेंडॉल टाकून मोबाईल नंबरचे बॅनर लावले. काहींनी दुकानावर केवळ मोबाईल नंबरचे स्टीकर चिकटवून ठेवले. शहरातील दुकानांसमोरूही दारूसाठी मद्यपींनी गर्दी केली. मोबाईल नंबर घेऊन त्यांनी ऑनलाईन ऑर्डर दिली. परंतु घरपोच दारू मिळणारे मोजकेच ठरले. बहुतांश दुकानदारांना आजचा दिवस ऑनलाईनची प्रक्रिया करण्यात गेला. घरपोच सेवा देण्यासाठी डिलिव्हरी बॉयचीही व्यवस्था त्यांना करावी लागली. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्यांना प्रत्यक्ष घरपोच सेवा ही उद्या शनिवारपासून होईल. दरम्यान, धरमपेठ येथील अंकुर वाईन शॉपमधून थेट काऊंटरवरून दारू विक्री केली जात होती. याची माहिती होताच पोलिसांनी दुकान बंद करायला लावले.
आधार कार्डसाठी धावपळ
दारू खरेदीसाठी मागणी फॉर्म भरणे आवश्यक करण्यात आले आहे. यात हा फॉर्म दुकानदाराकडे असून तो ग्राहकाला भरून द्यायचा आहे. यात ग्राहकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, दारूचे बॅ्रण्ड, प्रमाण आणि आधार नंबर भरून द्यायचा आहे. परंतु शहरात ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्यां ग्राहकांनाही काही दुकानदारांनी हा फॉर्म भरायला दिला. तेव्हा अनेकांकडे आधार कार्ड नव्हते. यासाठी त्यांना पुन्हा घरी जाऊन आधार कार्ड घेऊन यावे लागले.
दोन दिवसात ४०० आजीवन परवाने, २ हजार अर्ज प्रतीक्षेत
नागपुरात ‘लॉकडाऊन’दरम्यान दारू खरेदीसाठी परवाना आवश्यक करण्यात आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ग्राहकांच्या चकरा वाढल्या आहेत. होम डिलिव्हरीच्या अटीवर दारू विक्री सुरू होण्याचे संकेत मिळताच बुधवारपासूनच परवाना बनवण्यासाठी ग्राहक कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. गुरुवारी २०० लोकांनी आजीवन परवाना बनवला. शुक्रवारी पुन्हा २०० लोकांना परवाने मिळाले. या दोन दिवसातच २ लाखाचा महसूल विभागाला मिळाला. २ हजार अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत.