अनुसूचित जातीच्या प्रत्येक कुटुंबाला घर
By admin | Published: February 7, 2016 03:03 AM2016-02-07T03:03:05+5:302016-02-07T03:03:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जि.प. मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. २०१९ पर्यंत या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर दिले जाईल. त्यासाठी राज्य सरकारने निधीचे नियोजन केले आहे. घर निर्मितीसाठी विशेष सेल तयार करण्यात आला आहे. यासोबतच ग्राम विकास खात्यांतर्गत यंत्रणा उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने दीक्षाभूमीच्या विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ९ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, एवढ्याने होणार नाही. आपण नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांसी चर्चा केली असून दीक्षाभूमीच्या विकासाचा १५० कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. या आराखड्याला मंजुरी देण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देश विकासाच्या दिशेने जात आहे. जगाताली सर्व संविधानात भारतीय संविधानाचा पहिला क्रमांक लागतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ताकद संविधानात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मध्यप्रदेशने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे.
मध्यप्रदेशचा पॅटर्न पाहिला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ लाख शेततळे देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच ठिंबक सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला जात आहे. ठिंबक सिंचनासाठी लागणारे कृषी साहित्य महागात पडते. त्यामुळे येत्या काळात या साहित्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून किंमती ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, आशीष देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जून रेड्डी, नागो गाणार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, संध्या गोतमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारणारे मूर्तीकार शंतनु इंगळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा आवर्जून उल्लेख पालकमंत्री बावनकुळे व जि.प. अध्यक्ष सावरकर यांनी केला. या सोहळ्यात हार तुऱ्याचा खर्च न केल्यामुळे वाचलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.(प्रतिनिधी)
नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त करू
राज्यातील पाच हजार गावे हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. येत्या काळात नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे ध्येय असून त्यासाठी शासकीय यंत्रणेने कामाला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
महिला बचत गटांसाठी मॉल
महिला बचत गटांचे मॉल उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेने सर्वात पहिला प्रस्ताव पंडित बच्छराज व्यास चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेचा दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली असून आणखी एक प्रस्ताव जिल्हा परिषदेने सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मिहानमध्ये लॉजिस्टीक पार्कला मंजुरी देण्यात आली असून १५०० कोटींची गुंतवणूक होत आहे. यातून युवकांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.